आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात ३० जून ते ३ जुलैपर्यंत संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:47 IST2020-06-29T18:45:25+5:302020-06-29T18:47:07+5:30
पोलीस अधीक्षक मनोज पाटील : रुग्णालय, मेडिकल सोडून सर्व बंद, वारकऱ्यांना बंदी

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात ३० जून ते ३ जुलैपर्यंत संचारबंदी
पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्या निमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी ३० जून दुपारी २ ते ३ जुलै पहाटे पाचपर्यंत संचारबंदी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
आषाढी एकादशीचा सोहळा निमित्त माहिती सांगण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या दरम्यान ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा अधिकारी संजय जाधव, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांत अधिकारी सचिन ढोले, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोनी. दयानंद गावडे, पोनी. अरुण पवार उपस्थित होते.
आषाढी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकर्यांची गर्दी होऊ नये. यासाठी पंढरपूर शहर व शहरालगतच्या व ८ गावांमध्ये ३ दिवस संचार बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. परंतु शहरात रुग्णालय व मेडिकल चालू राहतील. त्याचबरोबर संचार बंदीचा कालावधी नागरिकांना भाजीपाला व दूध पोहोच करण्याचे काम नगरसेवक व कोविड वॉरियर्स करतील. यामुळे संचारबंदी चा कालावधीत पुरेल इतके किराणा मालाचे साहित्य नागरिकांनी भरून घ्यावे. आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
३० जूनला पालख्या येतील...
२ जुलैला माघारी परतील
३० जूनला संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत मानाच्या पालख्या पंढरपूरमध्ये त्यांच्या - त्यांच्या मठांमध्ये प्रवेश करते. प्रत्येक पालखीसह दहा ते वीस लोक असतील. २ जुलै ला रात्री ८ वाजता आलेल्या मार्गाने त्यांच्या त्यांच्या गावी माघारी परततील. १ जुलै रोजी पहाटे अडीच ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.