Corona Saw on Ashadhi Wari Planning | coronavirus; आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

coronavirus; आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

ठळक मुद्देआषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मानाच्या प्रमुख ९ पालख्या आहेत

पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यासाठी मानाच्या नऊ प्रमुख पालख्यांसह दोन हजारांच्या आसपास दिंड्या प्रवास करुन पंढरपुराकडे येत असतात. यामुळे प्रशासनाला अडीच महिन्यांपासून नियोजन करावे लागते. परंतु सध्या कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे.  आषाढी सोहळ्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे चैत्री यात्रेप्रमाणे आषाढी यात्रा बैठकीवरही कोरोना रोगाचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

आषाढी पायी यात्रेच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात चैत्र शुध्द दशमीला श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, दिंडी समाज संघटनेच्या वतीने बैठक घेण्यात येते. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, शितोळे सरकार, आरफळकर मालक, ह. भ. प. वासकर महाराज, चोपदार, सर्व फड व दिंडीप्रमुख उपस्थित असतात. परंतु यावर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे चैत्र शुध्द दशमीला होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील परिस्थिती पाहून आषाढी नियोजनाची बैठक घेण्यात येणार असल्याचे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, दिंडी समाज संघटनेचे सदस्य ह.भ.प. देविदास महाराज ढवळीकर यांनी सांगितले.

यंदा कोरोना या साथीच्या रोगाचे संकट असून, त्यातच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे़ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन केले आहे. सध्या तरी लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत आहे. परंतु या रोगाचा प्रसार कमी झाला नाही तर आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनासह पालखी, दिंडीप्रमुखांना आषाढीची तयारी करायला जमणार नाही. यामुळे यंदाचा आषाढी सोहळा खंडित होण्याची भीती वारकरी व महाराज मंडळींमध्ये आहे.

प्रमुख ९ पालख्यांसह असतात लाखो भाविक
- आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मानाच्या प्रमुख ९ पालख्या आहेत. यामध्ये श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत मुक्ताबाई, श्रीसंत सोपान महाराज, श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज, श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत नामदेव महाराज, श्रीसंत गजानन महाराज, श्रीसंत निळोबाराय महाराज आदी पालख्या प्रमुख आहेत. या पालख्यांबरोबर लाखो वारकरी असतात. परंतु सध्या एका ठिकाणी जमाव करण्यास बंदी असल्याने पालखी सोहळा रद्द होण्याची शक्यता आहे.

Web Title: Corona Saw on Ashadhi Wari Planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.