In the computer age, young people are forgetting about Sanskrit: Appasaheb Khot | संगणकाच्या युगात तरुणाईला पडतोय संस्काराचा विसर : अप्पासाहेब खोत
संगणकाच्या युगात तरुणाईला पडतोय संस्काराचा विसर : अप्पासाहेब खोत

ठळक मुद्देप्रा. खोत यांनी अस्सल ग्रामीण भाषेत ‘गॅदरिंगचा पाहुणा’ ही कथा ढंगदार शैलीत सांगत उपस्थितांना खळखळून हसविलेकथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील छोट्या-मोठ्या गोष्टी विनोदी शैलीत मांडल्या

सोलापूर : संगणक, मोबाईलच्या युगामध्ये प्रगती झाली; मात्र संस्कार, मूल्य, आपुलकीबाबतची स्थिती चिंताजनक आहे. आई-वडिलांना नमस्कार करणे, त्यांच्याबद्दल आदरभाव जपण्याचे संस्कारमूल्य सध्याची तरुणाई विसरत चालली आहे, असे प्रतिपादन ग्रामीण कथाकथनकार प्रा. अप्पासाहेब खोत यांनी केले.

जनता सहकारी बँक सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रा. खोत बोलत होते. ‘कथाकथन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँकेचे संचालक प्रमोद भुतडा यांनी प्रा. खोत यांचे स्वागत केले. 

प्रा. अप्पासाहेब खोत म्हणाले, झाड, वेलीवरील फुलांचा सुगंध हवेत पसरतो, वाळल्यानंतर ती मातीवर पडल्यावरही त्या सुगंध देत असतात. ज्या मातीत रुजलो, वाढलो, त्यासही सुगंधी करण्याचा आदरभाव झाड, फुलांकडून शिकण्यासारखा आहे. विविध क्षेत्रात कर्तृत्वाने मोठी झालेली व्यक्ती मातीचे ऋण फेडण्यासाठी अव्याहतपणे प्रयत्न करतात. यामुळे ते यशस्वी होण्यासोबत लौकिकही मिळवतात. या मोठ्या माणसाचे कार्य हे झाड व फुलांसारखे आहे. त्यांच्या प्रमाणे माणूस म्हणून जगताना आपण इतरांना काय दिले? याबाबत आत्मचिंतन करून सकारात्मक कृतीशीलता जपणे महत्त्वाचे आहे.  माय-माती या शब्दामध्ये वेलांटीचा फरक असून दोघांचे ऋण फेडणे हे माणसांचे आद्य कर्तव्य आहे. या दोघांचे स्थान आपल्या आयुष्यात खूप वरचे आहे. त्यांच्यामुळेच जीवनाला अर्थ मिळत असल्याने त्यांचा आदर राखायलाच हवा.

प्रा. खोत यांनी अस्सल ग्रामीण भाषेत ‘गॅदरिंगचा पाहुणा’ ही कथा ढंगदार शैलीत सांगत उपस्थितांना खळखळून हसविले. कथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील छोट्या-मोठ्या गोष्टी विनोदी शैलीत मांडल्या. 


Web Title: In the computer age, young people are forgetting about Sanskrit: Appasaheb Khot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.