शिक्षणामध्ये बदल आवश्यक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:25 PM2019-03-16T12:25:45+5:302019-03-16T12:27:30+5:30

आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळात पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्यानंतर भारत सरकारने त्यांना सडेतोड उत्तर दिले. अशा प्रकारच्या कारवाया आपल्या ...

Changes in Education Needed! | शिक्षणामध्ये बदल आवश्यक !

शिक्षणामध्ये बदल आवश्यक !

Next
ठळक मुद्देआपल्या देशात येणारा दहशतवादी या विद्यार्थ्यांनी नजरेतून ओळखला पाहिजेया देशातील शिक्षणातील सर्वात मोठी गंमत म्हणजे नोकरीसाठी शिक्षण अशी पालकांची धारणा झालेली

आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळात पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्यानंतर भारत सरकारने त्यांना सडेतोड उत्तर दिले. अशा प्रकारच्या कारवाया आपल्या शेजारच्या देशांकडून सतत घडत असतात. आपण स्वत:हून कधीही कोणावरही हल्ला केला नाही आणि भविष्यातही करणार नाही,परंतु आपल्या देशावर अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया जर होत असतील तर त्याला तोंड देण्यासाठी  आपण फक्त सैनिकांवरच अवलंबून राहणार का?

सैनिक आमच्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यानिमित्तानं भारत सरकारला सांगावंसं वाटतं की या देशाचा प्रत्येक नागरिक हा सैनिक झाला पाहिजे. देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तयार असला पाहिजे. 

यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे.आपल्या भारत देशातील प्रत्येक शाळेमध्ये प्राथमिक स्तरापासून सैनिकी शिक्षणाची व्यवस्था असली पाहिजे. भविष्यात तुम्ही कोणत्याही विषयांमध्ये प्रगती करा. सैनिकी शिक्षण हे अनिवार्य असलेच पाहिजे. आज आपल्या देशात काही मोजक्याच सैनिकी शाळा आहेत. त्यामध्ये प्रवेश मिळणं ही सुद्धा अत्यंत अवघड गोष्ट आहे.आपल्या भारतातील प्रत्येक शाळा ही सैनिकी शाळा बनली पाहिजे.

आमच्या देशातल्या प्रत्येक शाळेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना शिक्षक म्हणून नेमणूक दिली पाहिजे. या विद्यार्थ्यांना या माजी सैनिकांनी सैनिकी शिक्षण दिले पाहिजे. भविष्यामध्ये अशा प्रकारचा हल्ला आपल्या देशावर करण्याचे धाडस कुणीही करू नये. यासाठी हे शिक्षण अत्यावश्यक आहे. हे दहशतवादी कधी, कुठे, कसा हल्ला करतील सांगता येत नाही. त्या वेळेला आमचा नागरिक पळून जाता कामा नये. अशा प्रसंगांमध्ये त्या नागरिकाने त्या ठिकाणी उभे राहून ठामपणे या हल्ल्याचा प्रतिकार केला पाहिजे.यासाठी प्राथमिक स्तरापासून त्याला प्रशिक्षणाची गरज आहे. 

यानिमित्ताने भारत सरकारने हा विचार लक्षात घेतला पाहिजे. या सेवानिवृत्त सैनिकांना सुद्धा शाळांमध्ये काम करायला निश्चित आवडेल. त्यांच्या माध्यमातून आमचा प्रत्येक विद्यार्थी सैनिक झाला पाहिजे. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याला सैनिकी प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. सैनिकी शिक्षण घेतलं याचा अर्थ त्यांना भविष्यात सैनिकाची नोकरी केलीच पाहिजे असं नाही. भविष्यात तो कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असेल पण युद्धाच्या प्रसंगी, दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रसंगी तो सर्वार्थाने समर्थ राहील. आपल्या देशात येणारा दहशतवादी या विद्यार्थ्यांनी नजरेतून ओळखला पाहिजे. 

जगातल्या प्रत्येक देशाला आमच्या भारतातला प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे हे लक्षात येईल. जगातला कोणताही देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही.जर त्यांनी अशा प्रकारचा भ्याड हल्ला केला तर आमचा प्रत्येक नागरिक त्या त्या परिसरातून आपल्या सैनिकांना मदत करण्यासाठी तत्पर राहील. सैनिकांच्या मनामध्ये सुद्धा मी एकटा नाही, या देशातला प्रत्येक नागरिक माझ्यासोबत आहे हे मानसिक बळ त्याला मिळेल.

प्रत्यक्ष अशा घटना घडल्यानंतर त्या भागातला प्रत्येक नागरिक आमच्या सैनिकांच्या मदतीला धावून जाईल. तो दहशतवादी हल्ला त्वरित परतवून लावेल. जगातल्या प्रत्येक दहशतवाद्याला आपल्या देशाची भीती वाटली पाहिजे.भारताच्या नादाला लागून काही उपयोग नाही. आम्ही भारताच्या विरुद्ध वक्रदृष्टी केली तर भारत आम्हाला सोडणार  नाही. अशा प्रकारची भीती जगातल्या प्रत्येक देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. यासाठी हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. याची अंमलबजावणी झाली पाहिजे.   

या देशातील शिक्षणातील सर्वात मोठी गंमत म्हणजे नोकरीसाठी शिक्षण अशी पालकांची धारणा झालेली आहे. हा विचार बदलला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर आपला देश या जगामध्ये सर्वार्थाने संपन्न आणि समृद्ध राहील.
- डॉ. अनिल सर्जे
(लेखक संगीत तज्ज्ञ आहेत)

Web Title: Changes in Education Needed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.