खग्रास चंद्रग्रहणानिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या नित्योपचार वेळेत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:38 IST2026-03-02T18:37:07+5:302026-03-02T18:38:13+5:30
ग्रहणामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्योपचार वेळेत बदल करण्यात आला आहे.

खग्रास चंद्रग्रहणानिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या नित्योपचार वेळेत बदल
पंढरपूर : खग्रास चंद्रग्रहण मंगळवार, ३ मार्च रोजी असल्याने विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या नित्योपचार पूजाविधीच्या व वेळेत शास्त्रोक्त नियमानुसार आवश्यक बदल करण्यात येत असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
पंचांगानुसार ग्रहणाचा स्पर्श सायंकाळी ६:३४ वाजता असून, मोक्ष सायंकाळी ६:४८ वाजता आहे. पंढरपूर येथे सूर्यास्त सायंकाळी ६:३४ वाजता होत असल्याने सायंकाळी ६:३४ ते ६:४८ (एकूण १४ मिनिटे) या कालावधीत ग्रहण नियम पाळण्यात येणार आहेत.
ग्रहण काळातील प्रमुख बदल पुढीलप्रमाणे: काकड आरती व नित्यपूजा पहाटे ४ ते ५:५५ वा. नेहमीप्रमाणे. महानैवेद्य सकाळी १०:४५ ते ११ वा. महानैवेद्यामध्ये नेहमीचा नैवेद्य दाखविण्यात येणार नाही. त्याऐवजी सुकामेवा नैवेद्य दाखविण्यात येईल.
पोशाख/दुपारचा नैवेद्य (४:३० ते ५ वा.) ग्रहणाचा वेध सुरू होणार असल्याने लाडूचा नैवेद्य दाखविण्यात येणार नाही. त्याऐवजी सुकामेवा दाखविण्यात येईल. ग्रहण स्पर्शानंतर (सायं. ६:३४ वा.) विठ्ठल व रुक्मिणी माता तसेच मंदिरातील व मंदिराबाहेरील सर्व परिवार देवतांना चंद्रभागा नदी (भीमा) नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात येईल. ग्रहण मोक्षानंतर (सायं. ६:४८ वा.) सर्व देवतांना पुनः स्नान घालून शुद्धीकरण विधी पूर्ण करण्यात येईल.
धुपारती : रात्री ९:३० वा. शेजारती रात्री १२ वाजे नंतर नेहमीप्रमाणे होईल. खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या नित्योपचारात वरीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत.