हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करा : पणन मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:27 IST2019-02-23T17:25:51+5:302019-02-23T17:27:58+5:30
सोलापूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना कृषि उत्पन्न बाजार समितीने रद्द करावा, असे आवाहन सहकार ...

हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करा : पणन मंत्री
सोलापूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना कृषि उत्पन्न बाजार समितीने रद्द करावा, असे आवाहन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
कृषि पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजना आणि ई-नाम योजनेच्या पुरस्कारांचे वितरण आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, धामणगावचे मोहन इंगळे, दोंडाईचाचे नारायण पाटील, आटपाडीचे भाऊसाहेब गायकवाड, उमरेडचे रुपचंद्र कडू आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. मात्र बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही. त्यामुळे बाजार समितीच्या बाबत काही सुधारणा कराव्या लागल्या. शेतकऱ्यांना भाव मिळावा या हेतुने बाजार समितीची सुरवात झाली. पण काही बाबतीत चुकीच्या प्रथा पडल्या. त्या दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.
राज्यातील जास्तीत जास्त बाजार समित्यांनी ई-नाम योजनेत सहभागी व्हावे, यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. कारण ई-नाम योजनेत सहभागी झाल्यामुळे शेतकऱ्यांना देशभरातील बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे स्पर्धा होऊन शेतकरींना चांगला भाव मिळतो आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, सोलापूर शहर उपनिबंधक कुंदन भोळे, व्यवस्थापक अनिमेश पाटील आदी उपस्थित होते.