Breaking; जागेच्या कारणावरून रेल्वेत प्रवाशावर चाकूने हल्ला; सोलापुरातील घटना
By Appasaheb.patil | Updated: September 28, 2022 09:02 IST2022-09-28T09:01:48+5:302022-09-28T09:02:34+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; जागेच्या कारणावरून रेल्वेत प्रवाशावर चाकूने हल्ला; सोलापुरातील घटना
सोलापूर : रेल्वेच्या जनरल डब्यात जागेच्या कारणावरून झालेल्या वादात दोघांनी एका प्रवाशावर चाकूने हल्ला केला. ही घटना मंगळवारी सोलापूरजवळ घडली. याबाबत मंगळवारी रात्री उशिरा सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २७ सप्टेंबर २०२२ रोजी आदम बुड्ढेसाहेब गुडेश्वर (वय ३२, राहणार विजयपूर कर्नाटक) हा गदग - मुंबई या रेल्वेने विजयपुर येथून त्याच्या पत्नीस आणण्यासाठी मुंबई येथे जाण्याकरिता जनरल डब्यात प्रवास करीत असताना तेथे बसल्यावर जागेच्या कारणासाठी दोन अनोळखी प्रवाशांनी त्याच्याशी वाद घालून त्याला लाथाबुक्क्याने, हाताने मारून त्याच्या डाव्या बरगडीजवळ चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर योग्य ते उपचार डॉक्टरांकडून चालू आहेत.
याबाबत सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड हे करीत आहेत.
दरम्यान, गुन्ह्याचे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, डीवायएसपी मौला सय्यद, एल सीपीआय इरफान शेख या अधिकाऱ्यांनी भेट दिली. या गुन्ह्यातील अनोळखी आरोपी शोधण्यासाठी कर्नाटक व विजापूर परिसरामध्ये दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.