घरातच दवाखाना चालवणाऱ्या बोगस डॉक्टरचे बिंग फुटले; असा झाला गुन्ह्याचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:45 IST2024-12-12T18:34:42+5:302024-12-12T18:45:39+5:30
एक व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये खासगी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या नागरिकांच्या लेखी तक्रारी तहसीलदार व सांगोला पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या.

घरातच दवाखाना चालवणाऱ्या बोगस डॉक्टरचे बिंग फुटले; असा झाला गुन्ह्याचा उलगडा
सांगोला : वैद्यकीय पात्रता नसताना विनापरवाना, बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीवितास व आरोग्यास धोका होईल, याची जाणीव असताना रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी नागरिकांच्या तक्रारीवरून बोगस डॉक्टर विरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा नोंदला आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अविनाश उत्तम खांडेकर (रा. लोटेवाडी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी डॉ. प्रवीण वीरूपक्षाप्पा बडगिरे (रा. लक्ष्मीनगर, दंडाची वाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९५६ चे कलम १५ व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर १९६१ चे कलम-३३ (२) व भारतीय न्याय संहिता कलम - ३१८(४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मीनगर येथील डॉ. प्रवीण बडगिरे हा मागील ४ ते ५ वर्षांपासून गावातील मारुती मंदिराजवळ स्वतःच्या घरामध्ये खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे नागरिकांच्या लेखी तक्रारी तहसीलदार व सांगोला पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तालुका आरोग्याधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांनी ११ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता लक्ष्मीनगर येथे भेट दिली असता सदर बोगस वैद्यकीय व्यवसायाचा प्रकार उघडकीस आला.
कागदपत्रांची पडताळणी
तालुका आरोग्याधिकारी डॉ. खांडेकर यांनी डॉ. प्रवीण बडगिरे यांच्याकडील असणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाच्या कागदपत्रांची तपासणी, पडताळणी केली असता त्यांच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९५६ किंवा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट २००० प्रमाणे संबंधितांकडे नोंदणी करून त्यासोबत शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक होते; परंतु अशी कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना डॉ. प्रवीण बडगिरे हा बोगस वैद्यकीय व्यवसाय करून, रुग्णांच्या जीवितास व आरोग्यास धोका होईल, याची जाणीव असताना फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.