Maharashtra Election 2019; भाजपने पोकळ राष्ट्रवादाचा राग आळवणे बंद करावे : शत्रुघ्न सिन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 12:13 IST2019-10-17T12:08:02+5:302019-10-17T12:13:29+5:30
शेरोशायरीने सरकारवर केली टीका; सोलापूरच्या जाहीर सभेत बिहारी बाबूचा राजकीय जलवा

Maharashtra Election 2019; भाजपने पोकळ राष्ट्रवादाचा राग आळवणे बंद करावे : शत्रुघ्न सिन्हा
सोलापूर : ३७० कलम रद्द, बालाकोट हल्ला, सर्जिकल स्ट्राईक अशा देशहिताच्या विषयावर आम्ही सरकारसोबत आहोत़ अशा राष्ट्रवादाच्या मुद्यांवर त्यांनी राजकारण करू नये़ भाजपचा हा राष्ट्रवाद पोकळ आहे़ त्यांनी वारंवार अशाच पोकळ राष्ट्रवादाचा राग आलाप सुरू ठेवला आहे़ हे चुकीचे आहे आणि तो बंद करावा, अशी राजकीय सूचना करत भाजपने विकासाच्या मुद्यांवर राजकारण करावे, असा मार्मिक सल्ला देखील भाजपचे जुने सहकारी असलेले विद्यमान काँग्रेस नेते, प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी दिला.
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सिन्हा यांची आज दुपारी कुमठा नाका येथे जाहीर सभा झाली़ यावेळी त्यांनी मोदी आणि अमित शहा यांचे प्रत्यक्ष नाव न घेता त्यांच्या कारभारावर आणि शेरोशायरीतून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली़ बिहारी बाबू अर्थात अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या सभेला तुफान गर्दी होती़ गर्दीला संबोधित करताना ते म्हणाले, मला ही निवडणूक प्रचाराची सभा वाटत नाहीय़ ही विराट विजयी सभा वाटत आहे़ या विजयी सभेचा मी साक्षीदार असल्याचा आनंद आहे़ सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मध्यच्या उमेदवार प्रणिती शिंदे, दक्षिणचे उमेदवार बाबा मिस्त्री, उत्तरचे उमेदवार मनोहर सपाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक रियाज हुंडेकरी, चेतन नरोटे, अॅड़ यु़ एऩ बेरिया, संजय हेमगड्डी आदी उपस्थित होते.
सिन्हा म्हणाले, भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना नोबल पुरस्कार जाहीर झाला आहे़ त्यांचेही म्हणणे आहे की भारतीय अर्थव्यवस्था भयानक अशा स्थितीत आहे़ यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे़ अशा बुद्धिवंतांचे म्हणणे सरकारने ऐकून घेतले पाहिजे़ त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे़ सरकारने विकासावर बोलले पाहिजे़ रोज तीन लाख युवक बेरोजगार होत आहेत़ महागाई वाढत आहे़ हंगर इंडेक्सच्या अहवालानुसार ११७ देशातील बेकारी, गरिबी, भूकबळीवर सर्व्हे झाला आहे़ यात १०२ क्रमांकावर भारत आहे़ तर बांगलादेश २८ व्या क्रमांकावर आहे़ श्रीलंका ७८ व्या क्रमांकावर आहे़ माझा मित्रपक्ष राजकारणावर इतका बोलत आहे की खरोखर विकास झाला की काय असे वाटते़ प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळी आहे.
मोदी अन् शहा यांचे नाव न घेता टीका
- जो पहुंच गऐं है मंजिल पे, उनको तो नही है नाजे सफर, दो कदम अभी चले नही, रफ्तार की बाते करते है, अशी शायरी झाडत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली़ ते म्हणाले की, नोटाबंदी ही अहंकारातून झाली आहे़ यातून आपण सारे उद्ध्वस्त झालो़ यात देशहित कुठेच नव्हता़ अजून यातून सावरलो नाही तोच जीएसटी लागू झाला़ जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले़ जीएसटीचा फायदा फक्त सीए लोकांनाच झाला आहे़ यातून देशाचे मोठे नुकसान झाले आहे़ ३७० कलम रद्द करताना सरकारने देशातील अभ्यासू लोकांशी चर्चा करणे अपेक्षित होते़ त्यांची सूचना घेऊन काश्मिर प्रश्न सोडवणे गरजेचे होते़ तसे त्यांनी केलेले नाही़ यातून काय बोध घ्यायचा़