भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:02 IST2025-11-17T18:01:59+5:302025-11-17T18:02:50+5:30
Angar Nagar Panchayat Elections 2025: अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने विजयाचा गुलाल उधळला. १७ जागा बिनविरोधी निवडून आल्या आहेत.

भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला पहिले यश मिळाले. अनगर नगर पंचायत निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच चित्र स्पष्ट झाले. अनगर नगरपंचायतीमधील सर्व १७ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बिनविरोध निवडून आले आहे. नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूक होणार आहे, हेही स्पष्ट झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची १७ सदस्यांसाठी निवडणूक लागली होती. १७ सदस्यांच्या जागांसाठी केवळ १७ अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूकच बिनविरोध झाली आहे. भाजपचे नेते माजी आमदार राजन पाटील यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
माजी आमदार राजन पाटील यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पाटील आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.
अशा पद्धतीने सर्व १७ जागा या बिनविरोध होणारी अनगर नगरपंचायत ही राज्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून, कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे.