‘भिडें’ना समर्थन नाही ! बाळा नांदगावकर याची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:33 IST2018-03-30T16:33:23+5:302018-03-30T16:33:23+5:30
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे संपर्कप्रमुख बाळा नांदगावकर यांची सोलापूर लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट

‘भिडें’ना समर्थन नाही ! बाळा नांदगावकर याची स्पष्टोक्ती
सोलापूर: ठाकरे कुटुंबाने कधी जातपात पाळली नाही. त्यामुळे मनसेने भिडे गुरुजींचे समर्थन करण्याचा अथवा न करण्याचा प्रश्न येत नाही. गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, असे प्रतिपादन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे संपर्कप्रमुख बाळा नांदगावकर यांनी केले.
मनसेच्या एका कार्यक्रमासाठी बाळा नांदगावकर गुरुवारी सोलापूरला आले असता सायंकाळी त्यांनी लोकमत कार्यालयाला भेट दिली. संपादक राजा माने आणि सहा. सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी लोकमतमधील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
नांदगावकर म्हणाले, एकबोटे गुन्हेगार होते म्हणून त्यांना अटक झाली. भिडे गुन्हेगार असतील तर त्यांना अटक करावी. राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. मराठी माणसांनी एकत्र का येऊ नये, हा आमचा मुद्दा आहे. बाळासाहेबांनी २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचे सांगितले. नवी पिढी त्याउलट ८० टक्के राजकारण करीत आहे, असा टोलाही त्यांनी शिवसेनेतील नव्या पिढीचे नाव न घेता लगावला.
राज्यातील राजकारणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे अलीकडे आमची टाळी मंचावरून मागत आहेत. मात्र २०१४ च्या निवडणुकीदरम्यान राज ठाकरे टाळी द्यायला त्यांच्याकडे गेले होते, तेव्हा त्यांनी घेतली नाही. महाराष्टÑाच्या विकासाची ब्लू प्रिंट आम्ही तेव्हा बनविली होती. ती पुढे भाजपानेच चोरली. आमची टाळी न घेता भाजपाकडे वळलेल्या शिवसेनेमुळे सर्वांचीच फसगत झाली. नुकसान सर्वांचेच झाले.
राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत वाढलेली जवळीक हे भविष्यातील युतीचे संकेत आहेत का, यावर ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही महाराष्टÑातील मोठी माणसे; त्यांचा स्नेह राजकारणाच्या पलीकडचा होता. राज ठाकरेंना त्याबद्दल आदर आहे. याचा अर्थ दोघांतील राजकीय जवळीक वाढली, असा काढला जाणे चुकीचे आहे. राज ठाकरे यांचे संबंध सर्वांशीच असून, त्यांचे द्वेषाचे राजकारण कधीच नसते.
या भेटीदरम्यान मनसेचे पदाधिकारी दिलीप धोत्रे, दिनकर मांजरेकर, निलेश भंडारे, युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, उमेश रसाळकर, सत्तार सय्यद, अमर कुलकर्णी, वैभव धोत्रे, अभिजित डुबल, जैनुद्दीन शेख यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.