बजरंग दलाचे काँग्रेसविरोधात सोलापुरात आंदोलन; निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणला
By Appasaheb.patil | Updated: May 10, 2023 14:44 IST2023-05-10T14:43:38+5:302023-05-10T14:44:26+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले.

बजरंग दलाचे काँग्रेसविरोधात सोलापुरात आंदोलन; निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणला
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : बजरंगदल आणि विश्व हिंदू परिषद या संघटनांची काँग्रेस सारख्या पक्षाकडून अतिरेकी संघटनांशी तुलना करून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, याचा निषेध तसेच बदनामी करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी बजरंग दलाच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने बजरंग दलाची तुलना पी.एफ.आय. सारख्या देशद्रोही , आतंकवादी आणि प्रतिबंधित असलेल्या संघटनेशी करून स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी बहुमताने निवडून आल्यास आम्ही बजरंग दलावर बंदी घालू असा उल्लेख जाहीरनाम्यात करून लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि सकल हिंदू बांधवांच्या भावना दुखवण्याचे कुटील कारस्थान केले आहे. याचा निषेध करण्यासाठी बुधवारी सकल हिंदू बांधव आणि बजरंग दल यांच्यावतीने आंदोलन करून काँग्रेसचा निषेध केला. यावेळी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक दिपक मुथ्या, शहर संयोजक नागेश बंडी, जिल्हा महाविद्यालय संपर्क प्रमुख सतीष आनंदकर यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.