बाळा, मी दहा तारखेला खाऊ घेऊन येतो म्हणाले होते; सोलापूरच्या सुपुत्राला वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 08:31 AM2022-04-21T08:31:19+5:302022-04-21T08:32:28+5:30

गोरख चव्हाण हे २००९ च्या तुकडीत मिलिटरीत चालक म्हणून सेवेत दाखल झाले.

Baby, I was told to bring food on the 10th, gorakh chavan martyr in uttarakhand | बाळा, मी दहा तारखेला खाऊ घेऊन येतो म्हणाले होते; सोलापूरच्या सुपुत्राला वीरमरण

बाळा, मी दहा तारखेला खाऊ घेऊन येतो म्हणाले होते; सोलापूरच्या सुपुत्राला वीरमरण

Next

सोलापूर/ वैराग : ‘बाळा आपल्या नवीन घराची वास्तुशांती आहे, मी दहा तारखेला येतो. रडायचं नाही... बरं का, मी येताना तुला खाऊ घेऊन येतो...’ कानी पडलेले हे शब्द आता नाहीसे झाले. उत्तराखंडमध्ये वीरमरण आलेले रातंजन (ता. बार्शी)चे सुपुत्र जवान गोरख हरिदास चव्हाण हे नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त येण्याची तयारी करीत होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

गोरख चव्हाण हे २००९ च्या तुकडीत मिलिटरीत चालक म्हणून सेवेत दाखल झाले. गुजरात, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड येथे सेवा बजावत उत्तराखंड येथे मालवाहतूक वाहनावर दाखल झाले. सहा महिन्यांपूर्वी ते गावी आले होते. तत्पूर्वी त्यांनी नवीन घराचे बांधकाम सुरू केले आणि जाण्यापूर्वी हे काम अर्धे पूर्ण केले. नंतर भाऊ, वडील, पत्नी यांनी ते बांधकाम पूर्ण करून घेऊन छोटासा टुमदार बंगला उभारला. गोरख हे व्हिडिओ काॅलिंगद्वारे घरकाम पाहत होते. गृहप्रवेश करण्याकरिता दहा तारखेला येणार होते. येताना चिमुकल्यांना खाऊ आणण्याचा शब्द दिल्याच्या वेदना बंधू शिवराम चव्हाण यांनी व्यक्त केली.

माळरानावर तीन एकर कोरडवाहू शेती असल्याने फारसे उत्पन्न येत नव्हते. आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. थोरले बंधू व गोरख यांनी गवंड्याच्या हाताखाली, शेतात मजुरीची कामे करून शिक्षण घेतले. दरम्यान, बंधू परिवहन महामंडळात चालक म्हणून लागले, तर गोरख देशसेवेत दाखल झाले. सोमवारी त्यांची रात्रपाळी असल्याने मंगळवारच्या मध्यरात्री एका सहकाऱ्याला सोबत घेऊन सैन्याच्या अत्यावश्यक वस्तू मालवाहतूक वाहनातून घेऊन पिथोरागडच्या घाटात आले. यावेळी गोरख यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने ते सहकाऱ्यासह खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले.

मुलांना व्हिडिओ काॅलवर बोलत

सहा महिन्यांपूर्वी भेटून गेलेले गोरख हे मुलांना नेहमी व्हिडिओ काॅलद्वारे बोलत होते. ते वास्तुशांतीला येण्याचा आग्रह करीत होते. मी लवकरच येतो, नवीन घरात जायचे आहे, येताना तुम्हाला खाऊ घेऊन येतो. मम्मी, आजोबांना त्रास द्यायचा नाही, असे मुलांना ते व्हिडिओ कॉलवरून बजावत होते.

पत्नी नि:शब्द झाली

मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांच्या कार्यालयाकडून फोन आला. अधिकाऱ्यांनी दुर्घटनेची माहिती दिली अन् पत्नी नि:शब्द झाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे व्हिडिओ पाठवून दिले. हे पाहून पत्नी हर्षदा यांना भोवळ आली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी त्यांचे पार्थिव रातंजनमध्ये आणले जाणार आहे.

Web Title: Baby, I was told to bring food on the 10th, gorakh chavan martyr in uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.