बाप रे...अवकाळी पावसामुळे कडब्याच्या भावात अडीच हजाराने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 15:07 IST2021-03-25T15:03:28+5:302021-03-25T15:07:06+5:30
अवकाळीचा फटका: वैरणीला वाढली मागणी

बाप रे...अवकाळी पावसामुळे कडब्याच्या भावात अडीच हजाराने वाढ
सोलापूर: ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्द्ध असलेल्या जिल्ह्यात कडब्याच्या भावात गेल्या तीन दिवसात अडीच हजाराने वाढ झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका व चाऱ्याला मागणी वाढल्याने हा बदल झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यंदा ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे रब्बीचा हंगाम लांबला. शेतात बराच काळ पाणी साचून राहिल्याने ज्वारीचे पेरणीक्षेत्र घटले. त्यामुळे पर्यायाने गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढले. फेब्रुवारीअखेर रब्बी सुगी तेजीत होती. अशात दोनवेळा ढगाळी हवामान निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी घाईने हंगाम आटोपता घेतला आहे. सुगीसाठी यंदा यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. गहू, हरभरा, करडई काढणीसाठी हार्वेस्टरचा मोठया प्रमाणावर वापर केल्याने अवकाळीने नुकसान टाळता आले आहे. पण ज्वारी काढणीसाठी मजुराचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे ज्वारी असलेल्या अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, माढा शिवारात लगबग दिसून आली.
गहू व हरभरा शेतकऱ्यांना चांगला पिकला आहे, पण ज्वारीला म्हणावा तसा उतारा मिळालेला नाही. त्यामुळे यंदा ज्वारीचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे असेच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. ज्वारीचे उत्पन्न जसे कमी आले तसे कडबाही कमीच आहे. पण चाऱ्यासाठी कडब्याला मोठी मागणी वाढली आहे. सुका चारा म्हणून दुभती जनावरे व बैलांना पावसाळ्यात कडब्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडब्याची साठवणूक सुरू केली आहे. कडब्याची मागणी वाढल्याने दक्षिण सोलापूर, मोहोळ व मंगळवेढा शिवारात व्यापारी फिरत आहेत. फेब्रुवारी दहा हजाराला एक हजार पेंढी कडब्याला भाव होता. गेल्या तीन दिवसात अवकाळी पावसाने हा भाव आता साडेबारा हजारावर गेल्याचे कडब्याचे व्यापारी नबीलाल शेख यांनी सांगितले.
६५ टक्केच पेरणी
अतिवृष्टीमुळे यंदा ज्वारीची केवळ ६५ क्षेत्रावर म्हणजे २ लाख २७ हजार ३५५ हेक्टरावर पेरणी झाली. यातील चांगले पीक येण्याचे क्षेत्र सुमारे २७ हजार हेक्टरांनी कमी झाले. त्यामुळे ज्वारी व चाऱ्यासाठी लागणाऱ्या कडब्याचे उत्पादन कमी झाल्याने मागणी वाढली आहे. याशिवार हरभऱ्याच्या मळणीसाठी ट्रॅक्टरवरील मशीनचा वापर झाल्याने काड्याचा भुगा होत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच हरभऱ्याच्या काड्यांना (भुसा) चाऱ्यासाठी मागणी वाढली आहे.