सोलापूर : बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेसमधून जबरदस्तीने दिल्लीला घेऊन जात असलेल्या दोन मुलींची सुटका रेल्वे प्रशासनाने केली. तिकीट तपासनीसच्या सतर्कतेमुळे ही घटना लक्षात आली. या घटनेनंतर त्या दोन मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये असलेले सोलापूर विभागातील तिकीट निरीक्षक संतोष कुमारांशी सोलापूर-मनमाड दरम्यान एका प्रवाशाने संपर्क साधून माहिती दिली. रेल्वेगाडीत दोन अल्पवयीन मुली रडत असून, त्यांना जबरदस्तीने दिल्लीला नेण्यात येत असल्याचे सांगितले. सोलापूरात रेल्वे तिकीट निरीक्षक आणि पोलिसांनी यापूर्वी अनेकांची सुटका केली आहे.
मुलींना आरपीएफकडे सोपविले रेल्वे कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती गोळा करण्यासाठी मुलींशी संवाद साथला आणि त्यांच्याशी ओळखीची पुष्टी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. पुढे सदरची ट्रेन बेलापूर स्थानकावर पोहोचल्यानंतर, पुढील तपास आणि आवश्यक कारवाईसाठी मुलींना आरपीएफकडे सुरक्षितपणे सोपवण्यात आले.
प्रवाशाची तत्परता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या प्रवाशाने तत्काळ संतोष कुमार आणि मुख्य तिकीट निरीक्षक सूर्यवंशी यांना घटना सांगितली. तिकीट निरीक्षकांनी तत्काळ आरपीएफ आणि नियंत्रण कक्षाला सदरील घटनेची संपूर्ण वर्णनात्मक माहिती दिली.
त्या दोघांचं डीआरएमने केले कौतुक संतोष कुमार आणि सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या समर्पणामुळे आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या जलद प्रतिसादामुळे मुलींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. या घटनेत सोलापूर विभाग तिकीट निरीक्षक कर्मचाऱ्यांच्या धाडसी आणि सतर्कतेबद्दल सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांनी कौतुक केले.