बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:06 IST2025-10-16T19:06:16+5:302025-10-16T19:06:59+5:30
Solapur Crime news: देवदर्शन करून घरी निघालेल्या पती-पत्नीवर तीन जणांनी हल्ला केल्याची घटना घडली. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून तिन्ही हल्लेखोर फरार झाले.

बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
Sangola Crime: बिरोबाचे दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीचा तिघा चोरट्याने पाठलाग केला. पतीच्या पाठीत सत्तुराने वार करून पत्नीच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. ही घटना मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास दुधाळवाडी पाटी ते महादेव मंदिर रोड फॉरेस्टमध्ये कटफळ, ता. सांगोला येथे घडली.
वैभव अर्जुन ढेरे (रा. खवासपूर, ता. सांगोला) यांनी याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी तीन इसमावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी वैभव ढेरे त्याची पत्नी मुलगा असे तिघे जण मिळून मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास खोसपूर येथून दुचाकीवरून कोळेगाव तालुका माळशिरस येथील मामा कचरे यांच्याकडे बिरोबा यात्रेनिमित्त गेले होते.
मामाची भेट व बिरोबाचे देवदर्शन घेऊन पती-पत्नी मुलासह सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोळेगाव येथून महुद मार्गे कटफळ, दुधाळवाडी पाटी फॉरेस्टच्या रोडने घराकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून दुचाकी वरून पाठलाग करणाऱ्या तिघांनी फिर्यादीला लांडा महादेव मंदिराकडे जाणाऱ्या फॉरेस्ट रोडमध्ये गाठले. दुचाकी चालवणाऱ्या तरुणांनी फिर्यादीची दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला.
ते थांबत नसल्यामुळे पाठीमागे बसलेल्या दुसऱ्यांनी सत्तुरने त्याच्या पाठीत वार केला. तिसऱ्याने पत्नीच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यावेळी पती-पत्नी ओरडू लागल्याने त्यांनी पती-पत्नीला जीव मारण्याची धमकी देऊन तेथून धूम ठोकली. त्यांचा पाठलाग केला असता वाटेत त्यांची दुचाकी मिळून आली; परंतु ते तिघे जण सापडले नाहीत.