करमाळ्यातील आदिनाथ साखर कारखाना आमदार रोहित पाटलांनी घेतला चालवायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 21:27 IST2021-01-12T21:26:53+5:302021-01-12T21:27:18+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

करमाळ्यातील आदिनाथ साखर कारखाना आमदार रोहित पाटलांनी घेतला चालवायला
करमाळा : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अँग्रोला २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. आदिनाथ कारखान्यावरील राज्य मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज असल्याने या बॅंकेने हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. गेल्या १५ वर्षांपासून आदिनाथ कारखान्यावर रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखालील बागल गटाची एकहाती सत्ता होती. मात्र संचालकांमधील मतभेद, योग्य नियोजनाचा अभाव, संचालकांचे अंतर्गत एकमेकांवर होणारे आरोप- प्रत्यारोप अशा कारणांनी हा कारखाना अडचणीत येत गेला.
आज मंगळवारी मुंबई येथे राज्य मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना बारामती ऍग्रोला देण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा येथील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय मानला जात होता. मात्र हा कारखाना मागील दहा वर्षांपासून रडतखडत चालत असल्याने कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कारखाना जवळ असूनही बाहेरील कारखान्यांना ऊस द्यावा लागत होता.
हा कारखाना सहकारीच राहावा, असे अनेकांना वाटत असताना बारामती अँग्रोने हा कारखाना चालवण्यास घ्यावा, असाही सूर शेतकऱ्यांमधून येत होता. कारखान्याच्या चहूबाजूंनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड असताना देखील कारखाना चांगल्या पद्धतीने चालू शकला नाही. आदिनाथ कारखान्याच्या कामगारांच्या पगाराचा प्रश्न तर महाराष्ट्रभर गाजला होता. अशा परिस्थितीत आदिनाथ कारखान्यावरील कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना कारखाना बंद अवस्थेत राहिला. त्यामुळे आदिनाथ कारखाना विकला जाणार की भाडेतत्त्वावर चालवला जाणार? याविषयी गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू होती.