सोलापुरात गणेशोत्सव शांततेसाठी २२२९ जणांवर कारवाईचा बडगा
By विलास जळकोटकर | Updated: September 21, 2023 17:54 IST2023-09-21T17:53:57+5:302023-09-21T17:54:41+5:30
नोटिसांद्वारे समज : अफवांवर विस्वास ठेऊ नका, पोलिसांचे आवाहन

सोलापुरात गणेशोत्सव शांततेसाठी २२२९ जणांवर कारवाईचा बडगा
विलास जळकोटकर
सोलापूर : गणेशोत्सवाच्या काळात शांतता नांदावी, उत्सव निर्भयपणे साजरा करता यावा यासाठी पोलिसांनी मॉकड्रिल, दहशत माजवणाऱ्यांना १२१४ जणांना नोटिसा बाजवण्यात आल्या आहेत. विविध कलमान्वये एकूण २२२९ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. उत्सवकाळात अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे.
सोलापुरात साजरा होणाऱ्या गणेश उत्सवात ११७७ सार्वजनिक गणेश मंडळांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जोडीला ९५ हजार घरगुती ‘श्री’ची प्रतिष्ठापना झाली आहे. त्यातच ई ए मिलाद हा मुस्लीम बांधवांचा उत्सवही या काळातच आहे. धार्मिक उत्सवाच्या काळात विघ्नसंतोषी मंडळी गैरफायदा घेऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याची शक्यता गृहित धरुन पोलीस आयुक्ताच्या हद्दीतील सात पोलीस ठाण्यामार्फत २२२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
यांच्यावर कारवाया
- ज्यांच्यावर अदखल पात्रे गुन्हे दाखल आहे अथवा परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत अशांवर पोलिसांनी कलम १०७ अन्वये.
- आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कलम १०८ अन्वये तर संशयास्पदरित्या हालचाल करताना सापडलेल्यांवर कुलम १०९ अन्वये कारवाई करण्यात आली.
- दोन पेक्षा अधिक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मंडळींवर कलम ११० अन्वये ॲक्शन घेण्यात आली.
- समाजातील अशांतेला बाधा आणणाऱ्या लोकांची यादी तयार करुन त्यांना कलम १४४ अन्वये तात्पुरते तडीपार करण्याची कारवाईही करण्यात आली आहे.