२ हजाराची लाच स्वीकारताना पंढरपूर तहसिल कार्यालयातील लिपीकास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 17:19 IST2018-09-04T17:04:53+5:302018-09-04T17:19:50+5:30

२ हजाराची लाच स्वीकारताना पंढरपूर तहसिल कार्यालयातील लिपीकास पकडले
सोलापूर : दोन हजार रूपयाची लाच स्वीकारताना पंढरपूर तहसिल कार्यालयातील लिपीक वसंत ईश्वर घुटुकडे (वय ४० रा़ चळे, ता़ पंढरपूर) यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार यांना मौजे चळे जमीन गट नं ५०१/२/ब/२ मधील ०़०४ आर क्षेत्र रस्त्यासाठी खरेदी करावयाचे आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेण्यासाठी अर्ज केला असून सदर फाईल सर्कल यांच्याकडून तहसिल कार्यालयात लिपीक घुटुकडे यांच्याकडे प्रलंबित होती़ ही प्रलंबित फाईल सकारात्मकपणे तहसिलदार यांच्या मार्फतीने परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी लिपीक घुटुकडे यांनी तक्रारदाराकडे २ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ ही लाच तहसिल कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर, सहा़ फौजदार जाधवर, पोलीस शिपाई शिरूर, पवार यांच्या पथकाने केली़