किराणा दुकानदारावर कोयत्यानं हल्ला; हल्लेखोराला दोन दिवस पोलिस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:40 IST2025-01-24T17:39:16+5:302025-01-24T17:40:09+5:30

ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी कोयत्याने दुकानदाराच्या डोक्यात चार वार करून गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली.

A grocer was attacked by a koyta in solapur | किराणा दुकानदारावर कोयत्यानं हल्ला; हल्लेखोराला दोन दिवस पोलिस कोठडी 

किराणा दुकानदारावर कोयत्यानं हल्ला; हल्लेखोराला दोन दिवस पोलिस कोठडी 

सोलापूर : दारूच्या नशेमध्ये येऊन किराणा दुकानदारावर कोयत्यानं वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुरुवारी (दि. २३) पहाटे २ वाजेच्या सुमारास फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुल्लाबाबा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या किराणा दुकानात हा प्रकार घडला. या प्रकरणी जखमी उमर बडेसाब पटेल (वय ४२, रा. सिद्धेश्वर पेठ, मुल्लाबाबा टेकडी, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. सोहेल ऊर्फ कासीम शेख (सोलापूर) या हल्लेखोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५ (२), ३५२, ३५१ (२), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट १९३२ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदला आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचे मुल्लाबाबा टेकडीच्या पायथ्याशी किरणा दुकान आहे. बुधवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नमूद आरोपी दारूच्या नशेत फिर्यादीच्या दुकानामध्ये आला. दुकानामध्ये फिर्यादीचे वडील बसलेले होते. त्यांना आरोपीने विनाकारण शिव्या देऊन मारहाण केली. या प्रकाराबद्दल फिर्यादीला समजले. तो विचारणा करण्यासाठी आरोपीकडे गेला असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात चार वार करून गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली. उपस्थित लोकांनाही त्याने शिव्या देऊन दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे करीत आहेत.

हल्लेखोरास दोन दिवस पोलिस कोठडी 

फौजदार चावडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन हल्लेखोर सोहेल ऊर्फ कासीम शेख याला गुरुवारी प्रथम न्यायदंडाधिकारी चव्हाण यांच्यापुढे उभे केले. तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावरून दोन दिवसाची पोलिस मिळाल्याचे तपास अधिकारी सपोनि रोहन खंडागळे यांनी सांगितले.

Web Title: A grocer was attacked by a koyta in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.