उमेदवारासोबत लहान मुलाला मतदान केंद्रात दिला प्रवेश; केंद्राध्यक्ष, पोलीस शिपाई निलंबित, निवडणूक आयोगाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:49 IST2026-02-11T13:48:50+5:302026-02-11T13:49:43+5:30

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होत असताना एका उमेदवारासह त्याच्या मुलाला प्रवेश दिल्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. 

A child was allowed into the polling station with a candidate; Center president, police constable suspended, Election Commission slams | उमेदवारासोबत लहान मुलाला मतदान केंद्रात दिला प्रवेश; केंद्राध्यक्ष, पोलीस शिपाई निलंबित, निवडणूक आयोगाचा दणका

उमेदवारासोबत लहान मुलाला मतदान केंद्रात दिला प्रवेश; केंद्राध्यक्ष, पोलीस शिपाई निलंबित, निवडणूक आयोगाचा दणका

- आप्पासाहेब पाटील, सोलापूर 
जिल्हा परिषद उमेदवारासोबत लहान मुलाला मतदान केंद्रात प्रवेश दिल्याप्रकरणी निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल मतदान केंद्राचे अध्यक्ष अण्णा सावता बुद्धे व त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलीस शिपाई गजानन राऊत या दोघांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मतदानादिवशी माळशिरस तालुक्यातील फोन सिरस जिल्हा परिषद गट मतदान केंद्र क्रमांक 267/39 व गुरसाळे पंचायत समिती गण क्रमांक 73 या मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अर्जुन सिंह मदनसिंह मोहिते पाटील हे मतदान करण्यासाठी आले होते. 

मतदान केंद्रात प्रवेश, ईव्हीएमचे बटण दाबले

त्यांनी मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी प्रवेश केल्यानंतर सोबत मुलगा होता. या मुलाला मतदान केंद्रात अटकाव करण्याची जबाबदारी मतदान केंद्राध्यक्ष अण्णा बुध्दे व पोलीस शिपाई गजानन राऊत यांची होती. पण यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्या मुलाने मतदान केंद्र कक्षात प्रवेश करून उमेदवारासोबत मतदानपेटी जवळ जाऊन मतदानाचे बटन दाबले. 

या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. ही चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशान्वये यासंबंधी उमेदवाराविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

आयोगाने काय दिले आहेत आदेश?

राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे. याप्रकरणी संबंधित केंद्रप्रमुख बुद्ध व पोलीस शिपाई राऊत यांच्याविरुद्ध निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

तसेच याप्रकरणी संबंधित उमेदवाराविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाईचा अहवाल तात्काळ निवडणूक आयोगाला सादर करावा असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: A child was allowed into the polling station with a candidate; Center president, police constable suspended, Election Commission slams