मामाचा नादच खुळा! भाच्याच्या लग्नाच्या वरातीत थेट बारबालांना नाचवलं; नातेवाईकांसह वऱ्हाडी पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:22 IST2025-02-26T10:21:25+5:302025-02-26T10:22:06+5:30
याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मामाचा नादच खुळा! भाच्याच्या लग्नाच्या वरातीत थेट बारबालांना नाचवलं; नातेवाईकांसह वऱ्हाडी पोलीस ठाण्यात
सोलापूर : भाच्याच्या लग्नाची वरात मामाने जोरात काढली. गीत संगीताच्या जोरावर वरातीत नाचणाऱ्या बारबालासह नातेवाइकांचा धिंगाणा. भाच्याची निघालेल्या लग्नाची वरातीची दखल पोलिसांनी घेत मामासह वन्हाड पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हवालदार प्रभाकर देडे यांनी फिर्याद दिली. त्यावरून शुभम गणेश फटफटवाले (वय २३), रवी रामसिंग मैनावाले (वय ४०, दोघे. रा. उत्तर सदर बाजार, सोलापूर) काकासाहेब अंबादास जाधव (विद्यानगर पाथरूड चौक, सोलापूर), युसुफ पिरजादे (या. दमाची नगर) व विशाल अर्जुन पाटील ( वय ३५, रा संजय नगर, कुमठा नाका, सोलापूर) विरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शुभम याचा सोमवारी विवाह होता.
"काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या...";एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण
विवाहानंतर त्याची मोठ्या धामधुमीत वरात काढण्यात आली. वरातीत पाहुण्यांचा तसेच नातेवाइकांचा मोठा लवाजमा सामील झाला होता. वरातीत स्पीकर लावून गायक गीत गात होते. वरातीच्या समोर काही महिला, नृत्यांगना नाचत होत्या. यामुळे वरातीत सामील झालेले लोक बेधुंद होऊन नाचत होते.
कंकुबाई हॉस्पिटल मागील बाजूस असलेल्या शीतलादेवी मंदिरासमोरील रस्त्यावर रात्री १०.३० वाजता वरात काढण्यात आली.
मामासह वहऱ्हाडी मंडळी ठाण्यात
वरातीतील गाण्यांमुळे त्रास परंतु वरातीत वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे परिसरातील लोकांना त्रास जाणवू लागला. याबाबतची माहिती काही वेळातच सदर बाजार पोलिसांना देण्यात आली. सदर बाजार पोलिस ठाण्यातील हवालदार प्रभाकर देडे, बाळू जाधव व इतर कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी वरात जागेवर थांबवली. त्यानंतर वरातीतील ट्रॅक्टर स्पीकर असा ८० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
काहींनी पळ काढला
या सर्व गोंधळामुळे वरातीत सहभागी झालेले लोक तिथून पसार झाले. परंतु मामाला यातून काढता पाय घेता आला नाही. पोलिसांनी मामा रवी मैनावले पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर इतरांनाही पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. तपास हवालदार वाघमारे करत आहेत.