तीन दिवसांत आढळले ७५ प्रकारचे पक्षी; डब्लूसीएफएसचे सोलापुरातील निरिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 11:54 IST2020-11-09T11:50:51+5:302020-11-09T11:54:58+5:30
पक्षी सप्ताह : राज्य शासनातर्फे ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान पक्षीसप्ताह जाहीर

तीन दिवसांत आढळले ७५ प्रकारचे पक्षी; डब्लूसीएफएसचे सोलापुरातील निरिक्षण
सोलापूर : पक्षीसप्ताहानिमित्त वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन फाउंडेशन सोलापूरतर्फे (डब्लूसीएफएस) जिल्ह्यातील विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण सुरू आहे. या निरीक्षणात मागील तीन दिवसांमध्ये ७५ प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत.
राज्य शासनातर्फे ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान पक्षीसप्ताह जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्त डब्लूसीएफएसच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षीनिरीक्षण करण्यात येत आहे. संस्थेतर्फे जिल्ह्यामध्ये १५ सदस्य हे काम करत आहेत. पक्षी दिसल्यानंतर त्यांच्या अधिवासासहित नोंदी घेतल्या जात असून त्याचे छायाचित्र जतन करण्यात येत आहे. पक्षीनिरीक्षणाच्या पहिल्यादिवशी (पाच नोव्हेंबर) ५७ पक्षी आढळून आले असून सात नोव्हेंबरपर्यंत ७५ पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.
पक्षीनिरीक्षणाच्या शेवटच्या दिवशी (१२ नोव्हेंबर) जिल्ह्यात आढळलेल्या पक्षांची यादी तयार करण्यात येणार आहे. या यादीमध्ये एकूण किती प्रकारचे पक्षी आढळले, त्यांचा अधिवास कुठे होता, त्यातील किती स्थलांतरित पक्षी आहेत, यासंबंधीचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे पक्षीनिरीक्षक शिवानंद हिरेमठ यांनी सांगितले.