सोलापूर : सोलापूर बाजार समिती निवडणुकीत रविवारी मतदान झाले. हिरज विकास सोसायटीचे संचालक नरसिंह महादेव माळी हे मयत आहेत. त्यामुळे तिन्हे मतदान केंद्रावर सहकारी संस्था मतदारसंघात एक मतदान कमी व्हायला हवे होते. मात्र, तिन्हे येथे सहकारी संस्था मतदारसंघात २४७ पैकी २४७ मतदान झाल्याची निवडणूक अधिकाऱ्यांची आकडेवारी आहे. हिरजमध्ये मात्र नरसिंह माळी हे मयत असल्याचे सांगितले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील सहकारी संस्था मतदारसंघात ८५६ पैकी ८५१ तर ग्रामपंचायत मतदारसंघात ३७० पैकी ३६६ असे १२६६ पैकी १२१७मतदारांचे मतदान झाले. सोलापूर बाजार समितीसाठी उत्तर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य व विकास सोसायटी मतदारसंघासाठी नान्नज जिल्हा परिषद परिषद शाळा, तिन्हे जिल्हा परिषद शाळा व शहरातील सिद्धेश्वर प्रशालेत मतदान केंद्रावर मतदान झाले. दुपारपर्यंत ८० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. सकाळीच तीनही मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. नान्नज मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, रोहन देशमुख, जितेंद्र साठे, पृथ्वीराज माने हे बराचवेळ तर दिलीपराव माने, मनीष देशमुख, शहाजी पवार, अविनाश मार्तडे, संग्राम पाटील हे काही वेळ थांबले होते.
एक जण दुबईला तर एक जण आजारीनान्नज मतदान केंद्रावर सहकारी संस्था मतदारसंघात रामभाऊ गवळी (नान्नज), मंगल भारत पाटील, वैजिनाथ पतंगे (बीबीदारफळ) हे तिघे मयत तर ग्रामपंचायत मतदारसंघात राधाबाई महांकाळेश्वर ताटे या दुबईला असल्याने मतदान कमी झाले. तिन्हे मतदान केंद्रावर सहकारी संस्था मतदारसंघात सर्व मतदारांनी मतदान केले तर ग्रामपंचायत मतदारसंघात पाथरीचे उपसरपंच श्रीमंत बंडगर व सदस्य आनंद बंडगर यांनी मतदान केले नाही. सोलापूर मतदान केंद्रावर सहकारी संस्था मतदानसंघाचे दोन संचालक मयत असल्याने तर ग्रामपंचायत मतदारसंघात सागर राठोड (गुळवंची) हे दवाखान्यात उपचार घेत असल्याने मतदान झाले नाही.