प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून सोलापूर विद्यापीठात १०० कोटी मंजूर

By संताजी शिंदे | Published: February 18, 2024 08:18 PM2024-02-18T20:18:18+5:302024-02-18T20:18:42+5:30

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी करणार योजनेचा शुभारंभ

100 crore sanctioned to Solapur University from Pradhan Mantri High Education Mission | प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून सोलापूर विद्यापीठात १०० कोटी मंजूर

प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून सोलापूर विद्यापीठात १०० कोटी मंजूर

सोलापूर : प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास १०० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवारी थेट प्रक्षेपणाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा शुभरंभ होणार आहे. बहुविध शिक्षण, संशोधन आणि पायाभूत विकासासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

शनिवारी रात्री केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून निधी मंजूर झालेल्या विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील चार विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचाही समावेश आहे आणि १०० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. २० फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण निधी मंजूर झालेल्या सर्व विद्यापीठांमध्ये दाखवण्यात येणार आहे. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उच्च शिक्षणाविषयी तसेच विद्यापीठांविषयी संबोधित करणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात २० फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील संचालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: 100 crore sanctioned to Solapur University from Pradhan Mantri High Education Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.