जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर; पहिल्याच नजरेत प्रेम अन् 4 वर्षांनी उरकलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:18 IST2023-03-14T16:18:07+5:302023-03-14T16:18:54+5:30
pratik mohite bodybuilder: जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर विवाहबंधनात अडकला आहे.

जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर; पहिल्याच नजरेत प्रेम अन् 4 वर्षांनी उरकलं लग्न
pratik mohite bodybuilder wife । मुंबई : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कधी कोण प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. माणसाची समाजातील उंची त्याच्या सौंदर्यावर नसून त्याच्या धाडसाच्या आधारे मोजली जाते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे 3.3 फूट प्रतिक मोहिते. जगातील सर्वात तरुण बॉडी बिल्डर म्हणून 28 वर्षीय प्रतीकचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. नुकताच प्रतिक विवाहबंधनात अडकला असून लोक त्याला शुभेच्छा देत आहेत. प्रतिकने इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात तो त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीचा आनंद लुटताना दिसत आहे.
प्रतिक रायगडचा रहिवासी असून त्याची पत्नी पुण्यातील असल्याचे तो सांगतो. प्रतिकची उंची 3 फूट 34 इंच असून त्याची पत्नी 4 फूट 2 इंच एवढ्या उंचीची आहे. प्रतिकने सांगितले की, 4 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याची आणि जयाची भेट घडवून आणली होती. याचदरम्यान प्रतिक जयाच्या प्रेमात पडला होता.
... म्हणून 4 वर्षे केलं नाही लग्न
प्रतिकने सांगितले की, "मी सर्वप्रथम 2018 मध्ये जयाला भेटलो होतो आणि मी बॉडीबिल्डिंगला 2016 मध्ये सुरूवात केली होती. जयाला भेटल्यानंतर मी तितकासा यशस्वी झालो नव्हतो. कारण लग्नानंतर जयाची जबाबदारी माझ्यावर पडणार हे मला माहिती होते. मी जयाला सांगितले की, मी सर्वप्रथम स्वत:च्या पायावर उभा राहिन आणि मग तुझ्याशी लग्न करेन. हळू हळू वेळ जात गेला आणि मला यश मिळत गेले. माझे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे आणि मी फिटनेस ट्रेनर बनलो आहे. जेव्हा मला वाटले की मी माझ्या पायावर उभा राहिलो आहे तेव्हाच मी लग्न केले."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"