चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 13:17 IST2026-01-11T13:16:35+5:302026-01-11T13:17:38+5:30
Women Sari Football Match Viral Video: फुटबॉल खेळण्यासाठी स्पोर्ट्स किटच हवं हा समज ओडिशातील रणरागिणींनी खोडून काढला आहे! सुंदरगड जिल्ह्यातील कोइडा येथील बडबलीजोर गावात महिलांनी साडी नेसून फुटबॉलचा जो थरार रंगवला, तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
फुटबॉल खेळण्यासाठी विशेष क्रीडा गणवेशाची गरज असते, हा समज ओडिशातील महिलांनी खोडून काढला आहे. सुंदरगड जिल्ह्यातील कोइडा येथील बडबलीजोर गावात पार पडलेल्या एका अनोख्या फुटबॉल सामन्याने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यात महिलांनी साडी नेसून मैदानात फुटबॉलचा थरार रंगवला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ओडिशाच्या माओवादग्रस्त पट्ट्यात मोडणाऱ्या या भागात महिलांनी केवळ सहभाग नोंदवला नाही, तर पूर्ण आत्मविश्वासाने खेळही केला. २५ ते ४० वयोगटातील या महिलांनी साडी नेसूनही ज्या चपळाईने मैदानात धाव घेतली, ते पाहून प्रेक्षक थक्क झाले. घराच्या चार भिंतींच्या आत राहूनही महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, असाच संदेश या खेळाडूंनी दिला.
हा सामना केवळ मनोरंजनासाठी नसून तो एका जागरूकता उपक्रमाचा भाग होता. समाजात खेळांबाबत असलेले लिंगभावाचे अडथळे तोडणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. साडी सांभाळत महिलांनी केवळ फुटबॉल खेळला नाही तर, समाजात सकारात्मक मेसेज दिला आहे. या सामन्यात प्रामुख्याने २५ ते ४० वयोगटातील गृहिणी आणि महिला सहभागी झाल्या होत्या. ताकद आणि कौशल्य हे कपड्यांवर अवलंबून नसून ते व्यक्तीच्या धैर्य आणि आत्मविश्वासावर अवलंबून असते, हे या महिलांनी सिद्ध केले.
ଶାଢ଼ି ପିନ୍ଧି ଫୁଟବଳ ଖେଳିଲେ ମହିଳା
— Sambad (ସମ୍ବାଦ) (@sambad_odisha) January 9, 2026
-ମାଓଗଡ଼ରେ ନିଆରା ପ୍ରୟାସ
-ଶାଢ଼ି ପିନ୍ଧି ଫୁଟବଲ ଖେଳିଲେ ମହିଳା
-ସୁନ୍ଦରଗଡ଼ ଜିଲ୍ଲା କୋଇଡା ବ୍ଲକ୍ ସୋୟମ୍ବା ପଞ୍ଚାୟତ ବଡବାଲିଯୋର ଅଞ୍ଚଳର ଫୁଟବଲ୍ ଖେଳ #Sambad#Football#Women#Sundargarh#Odishapic.twitter.com/xhyRzLno3h
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
बडबलीजोर गावातील हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्सकडून या महिलांचे जोरदार कौतुक होत आहे. "जिद्द असेल तर कपडे अडथळा ठरत नाहीत," अशा प्रतिक्रिया युजर्स देत आहेत. साडी नेसूनही खेळाप्रती असलेली ही निष्ठा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमामुळे सुंदरगड जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची नवी चर्चा आता सुरू झाली आहे.