Viral Video: घरात सिंह पाळणं अंगलट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:54 IST2025-07-07T12:53:37+5:302025-07-07T12:54:55+5:30
Pet Lion Attack on Civilians: सिंहाने एका महिलेवर आणि दोन मुलांवर हल्ला केल्याचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Viral Video: घरात सिंह पाळणं अंगलट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
पाकिस्तानच्या लाहोर येथील एका व्यक्तीला सिंह पाळणे चांगलेच महागात पडले आहे. संबंधित व्यक्तीने पाळलेल्या ११ महिन्याच्या सिंहाच्या पिल्लाने सुरक्षा भिंत ओलांडून नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक महिला आणि दोन मुले जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडले. ही भयानक घटना गुरुवारी रात्री (३ जुलै २०२५) घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
लाहोर पोलिसांनी एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने पाळलेल्या सिंहाने सुरक्षा भिंत ओलांडून एका स्थानिक महिलेसह पाच आणि सात वर्षाच्या मुलावर हल्ला केला. सिंहाने दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर पंजे मारले आणि महिलेला जमिनीवर पाडून तिच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने या हल्ल्यात जखमींना मोठी इजा झाली नाही. जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले. मात्र, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Pet lion escaped from owner and attacked woman and children pic.twitter.com/hTGmrZkkuL
— Mahadev Narumalla✍ (@Kurmimahadev) July 4, 2025
याप्रकरणी जखमी मुलांच्या वडिलांनी लाहोर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच सिंहाला जेरबंद करून वन्यजीव उद्यानात हलवण्यात आले आहे. या सिंहाची प्रकृती चांगली असल्याची माहिती वन्यजीव अधिकाऱ्याने दिली. याआधी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लाहोर येथील एका घरातून सिंह घरातून पळून गेला आणि परिसरात मुक्तपणे फिरत असताना एका सुरक्षा रक्षकाने त्याला गोळ्या घालून ठार मारले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.