खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 00:05 IST2025-06-17T00:03:17+5:302025-06-17T00:05:17+5:30
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे जोडपे हेल्मेट न घालता, वाहतूक नियमांना बगल देत बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत होते.

खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
सध्या सोशल मीडियावर जोडप्यांचे बाईकवरील प्रेम आणि स्टंटचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण दिल्ली-एनसीआरमधील नोएडा येथे घडलेल्या एका ताज्या घटनेत, चालत्या बाईकवरून धोकादायक पद्धतीने 'रोमान्स' करणाऱ्या एका जोडप्याला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. या रोमान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे जोडपे हेल्मेट न घालता, वाहतूक नियमांना बगल देत बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत होते. नोएडा पोलिसांनी या जोडप्याला ५३,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
काय आहे प्रकरण?
रविवारी, सोशल मीडियावर अवघ्या सहा सेकंदांची एक क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्ये एक तरुण बाईक चालवत असून, एक मुलगी बाईकच्या टाकीवर बसून तरुणाला मिठी मारून 'रोमान्स' करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या हातात हेल्मेट होते, परंतु बाईकस्वाराने ते घातले नव्हते. या बाईकचा नंबर दिल्लीत नोंदणीकृत आहे.
नोएडा: चलती बाइक पर इश्क फरमाते कपल का वीडियो हुआ वायरल, ट्रैफिक पुलिस ने काटा ₹53,500 का चालान। pic.twitter.com/9qSjXaeDcP
— Greater Noida West (@GreaterNoidaW) June 16, 2025
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, दोघेही एक्सप्रेसवेवर हेल्मेटशिवाय वेगाने बाईक चालवत होते. मुलीने हेल्मेट हातात धरले होते. पण, दोघांपैकी एकानेही हेल्मेट घातले नव्हते. हे जोडपे केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नव्हते, तर रस्त्यावरच्या इतर वाहनचालकांसाठीही मोठा धोका निर्माण करत होते.
सोशल मीडियावर टीकेचा भडीमार
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. अनेक युझर्सनी जोडप्याच्या या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली. अनेकांनी त्यांच्या बेजबाबदार वर्तनाला 'धोकादायक' म्हटले आणि अशा लोकांमुळे एक्सप्रेसवेवर अपघात होऊ शकतात अशी चिंता व्यक्त केली. काही जणांनी याला रस्ता सुरक्षा नियमांचे सरळसरळ उल्लंघन असल्याचे सांगत पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली.
नोएडा वाहतूक डीसीपी लखन सिंह यादव यांनी या प्रकरणाची दखल घेतली. ते म्हणाले की, "व्हिडीओची दखल घेऊन आम्ही मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली ५३,५०० रुपयांचे चलन (दंड) जारी केले आहे." त्यांनी सांगितले की, हे प्रकरण रविवारी दुपारी सेक्टर-३९ पोलीस स्टेशन परिसरातील असून, त्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.