Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 09:57 IST2025-12-31T09:56:48+5:302025-12-31T09:57:06+5:30
या व्हिडिओमध्ये पठ्ठ्याने चक्क चालती रिक्षा सोडून खाली उडी मारली आणि बॉलीवूड गाण्यावर रील बनवायला सुरुवात केली.

Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला!
सोशल मीडियावर रील बनवण्याच्या वेडाने सध्या तरुणाईला जणू वेड लावले आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा काहीच नेम राहिलेला नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अवलिया रिक्षाचालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पठ्ठ्याने चक्क चालती रिक्षा सोडून खाली उडी मारली आणि बॉलीवूड गाण्यावर रील बनवायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य तर व्यक्त केलंच आहे, पण काहींना हसूही आवरलेलं नाही.
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?
एका मोकळ्या मैदानात हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचे दिसते. व्हिडिओच्या सुरुवातीला हा तरुण रिक्षाच्या ड्रायव्हर सीटवर बसलेला दिसतो. रिक्षा धावत असताना तो दोन्ही हात सोडून देतो आणि बॅकग्राउंडला एक बॉलीवूड गाणं सुरू होतं. गाण्याचा ताल धरताच तो धावत्या रिक्षेतून चक्क खाली उतरतो. रिक्षा आपल्या वेगाने पुढे जात असते, पण या तरुणाला तिची कोणतीही पर्वा नाही. तो आपल्याच धुंदीत कॅमेऱ्यासमोर 'स्वॅग' दाखवत डान्स करतो.
रिक्षेची काळजी कुणाला?
विशेष म्हणजे, रिक्षा पुढे जाऊन कशाला धडकेल किंवा उलटेल याची त्याला अजिबात भीती वाटत नाही. तो रिक्षेला थांबवण्याचा प्रयत्नही करत नाही, उलट आपले एक्सप्रेशन्स कॅमेऱ्यात परफेक्ट कसे येतील याकडेच त्याचे पूर्ण लक्ष असते. रील पूर्ण होईपर्यंत रिक्षा बऱ्याच अंतरावर पुढे निघून जाते.
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
हा व्हिडिओ 'kashanrawat4' नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. नेटकऱ्यांनी यावर अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने गमतीने लिहिले, "बहुतेक रिक्षेचे हप्ते फिटल्याचा हा आनंद असावा", तर दुसऱ्याने सावध करत म्हटले, "अरे भावा, रिक्षा पकड आधी, नाहीतर ती थेट पाकिस्तानला पोहोचेल!" एकाने तर चक्क बजावले की, "रिक्षा थांबव रे, पुढे तलाव आहे!" रील बनवण्याच्या नादात अशा प्रकारे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे चुकीचे असले, तरी या तरुणाचा आत्मविश्वास पाहून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे.