VIRAL Video : तुमची ऑनलाईन ऑर्डर सुरक्षित आहे का? डिलिव्हरी बॉयने पाकीट उघडून केलं असं काही की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:43 IST2026-02-26T12:40:01+5:302026-02-26T12:43:07+5:30
ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा एक असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही पुन्हा कधीही सामान मागवताना दहावेळा विचार कराल. ग्राहकाचा विश्वास कसा पायदळी तुडवला जातो, याची ही जिवंत प्रचिती आहे.

VIRAL Video : तुमची ऑनलाईन ऑर्डर सुरक्षित आहे का? डिलिव्हरी बॉयने पाकीट उघडून केलं असं काही की...
हल्लीच्या धावपळीच्या जगात आपण किराणा मालापासून ते अगदी जेवणापर्यंत सर्व काही एका क्लिकवर ऑनलाईन मागवतो. पण ज्या विश्वासाने आपण या सोयीचा वापर करतो, त्याला तडा देणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डिलिव्हरी बॉयने ग्राहकाचे ब्लूबेरीचे पाकीट उघडून त्यातील फळे आरामात खाल्ली आणि उरलेले पाकीट पुन्हा पॅक करून डिलिव्हरीसाठी नेले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमका प्रकार काय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी पार्टनर एका स्टोअरच्या बाहेर उभा असलेला दिसतोय. त्याच्याकडे असलेल्या डिलिव्हरी बॅगेत ग्राहकाला द्यायच्या वस्तू होत्या. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, तो तरुण अतिशय निर्धास्तपणे बॅगेतून ब्लूबेरीचा डबा बाहेर काढतो. त्यानंतर तो डबा उघडून त्यातील काही ब्लूबेरी तोंडात टाकतो. एवढ्यावरच न थांबता, तो अगदी सराईतपणे तो डबा पुन्हा बंद करतो आणि बॅगेत ठेवून देतो.
ऑर्डर डिलीवर करने से पहले ब्लू बैरी निकाल कर खा लिया यह ब्लिंकिट डिलीवरी बॉय का कारनामा देखिए !!
— Deepesh Patel (@Deepeshpatel87) February 24, 2026
क्या ब्लिंकिट वालों यही है कस्टमर के सामान की सुरक्षा।। pic.twitter.com/HmUvYAo0Pl
कॅमेरा समोर असतानाही निर्लज्जपणाचा कळस
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एक व्यक्ती हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होती. डिलिव्हरी बॉयला आपण पकडले गेलो आहोत याची जाणीव होऊनही त्याच्या चेहऱ्यावर भीती किंवा पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. उलट कॅमेरा समोर असताना तो एखाद्या मॉडेलसारखे पोज देत राहिला. कॅमेरामॅनने जेव्हा स्टोअरच्या आत जाऊन विचारणा केली आणि बाहेर आला, तेव्हाही हा तरुण अतिशय निर्लज्जपणे हसताना दिसला.
नेटकऱ्यांचा संताप आणि कंपन्यांवर टीका
हा व्हिडिओ 'Deepeshpatel87' नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून कमेंट्समध्ये आपला राग व्यक्त केला आहे. काही युजर्सनी उपरोधाने म्हटले की, "बिचाऱ्याला भूक लागली असेल म्हणून खाल्ले असेल," तर अनेकांनी अशा कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. "डिलिव्हरी बॉयची ही कृती केवळ एका फळाची चोरी नसून ग्राहकांच्या आरोग्याशी आणि विश्वासाशी खेळ आहे," अशा शब्दांत नेटकऱ्यांनी ताशेरे ओढले आहेत.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
ऑनलाईन सामान मागवल्यानंतर ते घेताना त्याचे सील व्यवस्थित आहे का, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला पॅकेट उघडलेले किंवा टेप लावलेले आढळले, तर ते स्वीकारू नका आणि त्वरित तक्रार नोंदवा. अशा घटनांमुळे आता डिलिव्हरी कंपन्यांच्या सुरक्षा मानकांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.