Viral Video : बाप रे! हे कसलं लग्न... भर मांडवात उडाल्या खुर्च्या; राड्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:18 IST2026-02-27T13:15:33+5:302026-02-27T13:18:13+5:30
सध्या सोशल मीडियावर एका अशा लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे आनंदाऐवजी फक्त आरडाओरडा आणि हाणामारीच पाहायला मिळत आहे.

Viral Video : बाप रे! हे कसलं लग्न... भर मांडवात उडाल्या खुर्च्या; राड्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल!
लग्नाचा सोहळा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो रोषणाईचा झगमगाट, ढोल-ताशांचा गजरात नाचणारी वरात आणि पंगतीतील सुग्रास जेवण. पण सध्या सोशल मीडियावर एका अशा लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे आनंदाऐवजी फक्त आरडाओरडा आणि हाणामारीच पाहायला मिळत आहे. या लग्नात पाहुण्यांनी एकमेकांचे स्वागत फुलांनी नाही, तर थेट खुर्च्यांनी केलं आहे!
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं काय घडलं?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'askshivanisahu' नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, लग्नात जेवणाची पंगत सुरू आहे. पाहुणे आरामात टेबलवर बसून जेवणाचा आस्वाद घेत आहेत. पण, अचानक काही लोकांमध्ये वादाची ठिणगी पडते आणि पाहता पाहता या वादाचं रूपांतर मोठ्या हाणामारीत होतं.
बारात में हल्की मार हो गई गाइज 😂 pic.twitter.com/wNLAN2FmjD
— Shivani Sahu (@askshivanisahu) February 26, 2026
खुर्च्यांची फेकाफेकी आणि उडाला गोंधळ
सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद इतका विकोपाला गेला की, लोक चक्क एकमेकांवर प्लास्टिकच्या खुर्च्या फेकू लागले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, जेवणाच्या ताटांकडे दुर्लक्ष करत पाहुणे एकमेकांवर तुटून पडले आहेत. काही लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण रागाच्या भरात कोणाचंही कोणाकडे लक्ष नाहीये. लग्नमंडपात एकच अफरातफर माजली असून, पाहुणे जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत.
लग्नात नक्की सुरू काय..
व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरने मजेशीर कॅप्शन दिलं आहे की, "चील! वरातीत थोडीशी मारामारी झाली गाईज!" मात्र, व्हिडिओ पाहिल्यावर ही हाणामारी अजिबात हलकी-फुलकी वाटत नाही. अवघ्या काही सेकंदांत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून नेटिझन्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
नेटिझन्सच्या भन्नाट कमेंट्स
हा व्हिडिओ पाहून कुणी याला 'अनोखं लग्न' म्हटलंय, तर कुणी 'हे लग्न कमी आणि कुस्तीचा आखाडा जास्त वाटतोय' अशी टीका केली आहे. "जेवणात पनीर मिळालं नसेल म्हणून बहुधा हा राडा झाला असावा," असा टोलाही एका युजरने लगावला आहे. आजकाल सोशल मीडियामुळे लग्नातील डान्स आणि मजा-मस्तीचे व्हिडिओ तर व्हायरल होतातच, पण अशा प्रकारच्या संतापजनक आणि मजेशीर घटनाही तितक्याच वेगाने लोकांपर्यंत पोहोचतात. या 'खुर्ची फाईट'ने मात्र या लग्नाची चर्चा संपूर्ण इंटरनेटवर घडवून आणली आहे.