रीलच्या नादात मृत्युशी खेळ! चक्क धावत्या ट्रकखाली घुसवली बाईक; थरारक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:53 IST2026-01-20T17:51:13+5:302026-01-20T17:53:49+5:30
Bike Stunt Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुणाई किती भयाण पाऊल उचलत आहे, याचा हा धक्कादायक पुरावा! एका रीलसाठी या दुचाकीस्वारने चक्क भरधाव ट्रकच्या चाकांमध्ये आपली दुचाकी घातली.

रीलच्या नादात मृत्युशी खेळ! चक्क धावत्या ट्रकखाली घुसवली बाईक; थरारक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुण कोणत्याही थराला जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका राष्ट्रीय महामार्गावर जीवाची पर्वा न करता करण्यात आलेल्या एका जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ रस्त्याने जाणाऱ्या दुसर्या वाहनातील एका व्यक्तीने शूट केल्याचे समजत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकीस्वार महामार्गावर भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दिसत आहे. केवळ इन्स्टाग्राम रील्ससाठी कंटेंट बनवण्याच्या नादात हा तरुण चक्क एका चालत्या ट्रकच्या मागील दोन चाकांच्या अगदी जवळ आपली दुचाकी नेतो. अनेक सेकंदांपर्यंत तो आपल्या दुचाकीचे पुढचे चाक ट्रकच्या चाकांपासून अवघ्या काही इंच अंतरावर ठेवून समांतर वेगाने गाडी चालवतो.
मृत्यूला निमंत्रण देणारा स्टंट हा स्टंट इतका धोकादायक होता की, जर ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला असता किंवा रस्यावर छोटा खड्डा असता किंवा दुचाकीचे संतुलन किंचितही बिघडले असते, तर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असता. ट्रकच्या चाकांमध्ये अडकून भीषण अपघात होण्याची शक्यता असूनही हा तरुण आनंदाने स्टंट करताना दिसत आहे.
Reels and the race to go viral have pushed many youngsters to a point where they are ready to risk their lives for a few seconds of fame. One wrong move and the truck driver would have been held responsible for whatever followed. pic.twitter.com/4RIRMuEgfG
— Nikhil saini (@iNikhilsaini) January 20, 2026
नेटकऱ्यांचा संताप
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेचा महापूर आला आहे. नेटकऱ्यांनी संबंधित दुचाकीस्वारविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका युजरने संताप व्यक्त करत म्हटले की, "प्रसिद्धीसाठी आयुष्य पणाला लावणे योग्य नाही. एक रील अनेक आयुष्ये उद्ध्वस्त करू शकते." दुसऱ्या व्यक्तीने विज्ञानाचा संदर्भ देत राग व्यक्त केला, "जर त्याने शाळेत अभ्यास केला असता, तर त्याला 'बर्नोलीचे तत्त्व' माहित असते आणि हवेच्या दाबामुळे तो ट्रकखाली कसा खेचला जाऊ शकतो याची जाणीव झाली असती."
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
अशा प्रकारचे जीवघेणे स्टंट करणे हा केवळ गुन्हाच नाही, तर तो स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ आहे. वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी सूचना देऊनही तरुणाईमध्ये रीलचे वेड कमी होताना दिसत नाही. या प्रकरणात पोलीस आता संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेत असून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.