MHADA Lottery 2026: म्हाडाची मुंबईत २६४० घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कधी आणि कुठे भरायचा? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:36 IST2026-03-29T19:38:12+5:302026-03-30T12:36:51+5:30
Mumbai MHADA Lottery 2026 Registration and Dates: मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होणार!

MHADA Lottery 2026: म्हाडाची मुंबईत २६४० घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कधी आणि कुठे भरायचा? जाणून घ्या...
मुंबई: म्हाडातर्फे मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ३० मार्च रोजी दुपारी ३ पासून प्रारंभ होणार आहे.
'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ३० मार्च रोजी 'गो लाईव्ह' समारंभाद्वारे या सोडतीच्या प्रक्रियेचा प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी ३ पासून उपलब्ध राहील. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत २९ एप्रिल रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती ३० एप्रिल रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाणार आहे. आरटीजीएस/एनईएफटीद्वारे ३० एप्रिल रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.
मुंबई म्हाडा 2026 सोडतीचे वेळापत्रक: अर्ज प्रक्रिया आणि निकाल
सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी दिनांक ५ मे रोजी दुपारी ३ पर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी ८ मे रोजी दुपारी ३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी १२ मे रोजी दुपारी ३ पर्यंत केली जाणार आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १५ मे रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे नंतर जाहीर केले जाईल.
उत्पन्न गटानुसार उपलब्ध सदनिकांची संख्या
अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५ सदनिका
अल्प उत्पन्न गटासाठी ८५८ सदनिका
मध्यम उत्पन्न गटासाठी १४०८ सदनिका
उच्च उत्पन्न गटासाठी २२९ सदनिका
अर्ज नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता
अर्जदारांना नोंदणीसाठी व अर्ज भरण्यासाठी मोबाईल क्रमांक (आधार क्रमांकाशी संलग्न) व ई-मेल आय.डी. आवश्यक आहे. अर्जदारांना नोंदणीसाठी व पात्रतेसाठी १) आधार कार्ड, २) पॅन कार्ड, ३) अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदारांचे किमान १५ वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र ४) उत्पन्नाचा पुरावा म्हणून दि. ०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२५ (उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला ग्राहय धरला जाईल) आवश्यक आहे.
वार्षिक उत्पन्न गट आणि मर्यादा
१) अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये सहा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे.
२) अल्प उत्पन्न गटासाठी रुपये नऊ लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे.
३) मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे.
४) उच्च उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणार्यांउचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
कोणत्या गटासाठी अर्ज करता येईल? (पात्रता नियम)
१) अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
२) अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
३) मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
४) उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.