Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:27 IST2025-12-26T12:26:10+5:302025-12-26T12:27:10+5:30
Viral Video : कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी या पठ्ठ्याने चक्क एका साध्या विटेचा वापर करून घरगुती 'हीटर' तयार केला आहे.

Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
भारतीय माणसाचं डोकं आणि जुगाड यांचं एक वेगळंच नातं आहे. संसाधनं कमी असली तरी काम कसं फत्ते करायचं, हे भारतीयांकडून शिकावं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका 'देसी इंजिनिअर'चा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी या पठ्ठ्याने चक्क एका साध्या विटेचा वापर करून घरगुती 'हीटर' तयार केला आहे. अवघ्या ५० रुपयांच्या खर्चात तयार झालेला हा हीटर पाहून मोठे मोठे इंजिनिअर्सही अवाक झाले आहेत.
विटेवर कोरली कलाकुसर अन् बनला हीटर!
नेहमी घर बांधण्यासाठी वापरली जाणारी वीट या कामात येईल, असा विचारही कोणी केला नसेल. व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने सर्वात आधी एक साधी वीट घेतली. त्यावर नागमोडी आकाराची एक डिझाइन तयार केली. त्यानंतर त्या खोबणीमध्ये गरम होणारी तार फिट केली. ही तार विजेच्या बोर्डाला जोडताच वीट गरम होऊ लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या हीटरवर तो व्यक्ती चक्क अन्न शिजवतानाही दिसत आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडिओ 'Maximum_manthan' नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा जुगाड पाहून नेटकरी दोन गटात विभागले गेले आहेत. अनेकांनी याला 'भारतीय बुद्धिमत्तेचा आविष्कार' म्हटलं आहे. "असा जुगाड फक्त भारतातच होऊ शकतो," अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. ज्यांच्याकडे महागडे हीटर किंवा गॅस शेगडी नाही, त्यांच्यासाठी हा स्वस्त पर्याय असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
सावधान! हा 'जुगाड' जीवावरही बेतू शकतो
हा प्रयोग दिसायला जरी मजेशीर आणि स्वस्त वाटत असला, तरी तो तितकाच धोकादायकही आहे. तज्ज्ञांच्या मते, उघड्या तारा आणि विटेचा वापर करून बनवलेला हा हीटर शॉर्ट सर्किट किंवा विजेचा धक्का लागण्यास कारणीभूत ठरू शकतो. थोडी जरी निष्काळजी झाली, तर मोठी आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी पाहावा, घरी असा जीवघेणा प्रयोग करू नये, असा इशाराही अनेक सुज्ञ युजर्सनी दिला आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिलंय की, "हे टॅलेंट भारताबाहेर जाता कामा नये!" तर दुसऱ्याने म्हटलंय की, "पगारवाढ न मिळाल्यावर जेव्हा इंजिनिअर घरी बसतो, तेव्हा असंच काहीतरी घडतं." एकंदरीत, हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान चर्चेत आहे.