VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:40 IST2025-09-21T13:39:56+5:302025-09-21T13:40:58+5:30
एका तरुणीने आपला रेल्वे प्रवासाचा भयावह अनुभव शेअर केला आहे, ज्यामुळे महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

AI Generated Image
रेल्वे प्रवास हा सगळ्यांसाठी विशेषत: महिलांसाठी सुरक्षित मानला जातो. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, रेल्वे सुरक्षा दल आणि विशेष डबे अशी अनेक सुरक्षा व्यवस्था असते. तरीही, एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना अनेकदा विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणीने आपला भयावह अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका तरुणीने तिची आपबीती सांगितली. तिने लिहिले की, "मी नुकताच ट्रेनने प्रवास करत होते. काही वेळानंतर मला कळले की माझ्या कोचमधील तिकीट तपासणी करणाऱ्या टीसीने मला इन्स्टाग्रामवर शोधले आणि फॉलो रिक्वेस्ट पाठवली. मला वाटतं की त्याने माझे नाव आरक्षण चार्टमधून घेतले असावे." या घटनेमुळे ती अस्वस्थ झाली आणि तिला हे खूपच विचित्र वाटले. कारण प्रवासादरम्यान दिलेली वैयक्तिक माहिती फक्त प्रवासापुरती मर्यादित असावी, अशी तिची अपेक्षा होती.
इन्टरनेटवर जोरदार चर्चा!
या घटनेनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक युजर्सनी या घटनेची तक्रार करण्याची सूचना केली, तर काहींनी टीसी सोबत वाद घालू नये, असा अजब सल्ला दिला. एका युजरने लिहिले की, “कृपया ती रिक्वेस्ट स्वीकारू नकोस! हे खूपच विचित्र वर्तन आहे. जर तू ती रिक्वेस्ट स्वीकारलीस, तर तुला अनेक मेसेजेस येऊ लागतील.”
दुसऱ्या एका महिलेने तिचा अनुभव शेअर करताना सांगितले, “एकदा एका टीसीने माझे तिकीट तपासले आणि नंतर तो परत येऊन मला त्याच्या मागे यायला म्हणाला. मी लहान आणि घाबरलेली होते. मी त्याच्या मागे सेकंड एसीपर्यंत गेले. तिथे त्या व्यक्तीने मला सांगितले की, त्याला माझा मित्र बनायचे आहे आणि त्याने माझा नंबर देण्यासाठी जबरदस्ती केली.” या घटनेमुळे आता मोठी चर्चा रंगली आहे.