मीटरवर लिहा 'जम-जम', वीज बिल येईल 'कम-कम'; पाकिस्तानी मौलानाचा उपाय ऐकून सोशल मीडियाला हास्याचे 'करंट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 18:01 IST2025-03-28T17:57:43+5:302025-03-28T18:01:34+5:30
वीज बिल कमी येण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या कल्पना लढवतात.

मीटरवर लिहा 'जम-जम', वीज बिल येईल 'कम-कम'; पाकिस्तानी मौलानाचा उपाय ऐकून सोशल मीडियाला हास्याचे 'करंट'
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून उन्हाचा कडाका वाढला आहे. अजून एप्रिल, मे महिना बाकी आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून अनेक ठिकाणावरुन उष्माघाताची प्रकरणे समोर आली आहेत, या दिवसात वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. घरांमध्ये पंखे आणि कुलर वापरले जातात. या उपकरणांचा वापर करुन तीव्र उष्णतेच्या तावडीतून लोक वाचतील पण वीज बिलाच्या तावडीतून सुटणार नाहीत. पण, पाकिस्तानमध्ये एका मौलाना यांनी यावर उपाय दिला आहे. हा उपाय ऐकून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
पाकिस्तानमधील एका मौलानांनी वीजेच्या समस्येतून सुटका मिळवण्याचा मार्ग शोधला आहे. या उपायाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घरात घुसला वळू, बेडरुममध्ये दोन तास धिंगाणा! जीव वाचवण्यासाठी महिला लपली कपाटात, व्हिडीओ व्हायरल
वीज बिल कमी करण्यासाठी हा उपाय करा
व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाकिस्तानमधील आहे. तिथे आझाद जमीर नावाचे एक मौलाना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत असल्याचे दिसत आहे. त्याच वाहिनीवर सुरू असलेल्या एका कार्यक्रमात कराचीतील एका महिलेने वीज बिलाबाबत प्रश्न उपस्थित केला. वीज बिल जास्त येत आहे, कमी करण्यासाठी उपाय सांगा असा प्रश्न महिलेने उपस्थित केला. यावेळी त्या महिलेचा हा प्रश्न मौलानांनी ऐकताच, त्यांनी महिलेला एक खात्रीशीर उपाय सांगितला. यामध्ये त्यांनी सांगितले की, जर तुम्ही वीज मीटरवर तुमच्या बोटाने 'जम-जम' लिहिले तर तुमचे वीज बिल कमी येईल हे निश्चित आहे आणि तुम्हाला हे काम महिन्यातून दोनदा करावे लागेल. हे उत्तर ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
हा व्हायरल व्हिडीओ @apniisp नावाच्या अकाउंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ६० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडिओवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंटही केल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.