१०५ वर्ष जुन्या ट्रॅक्टरला भंगार समजत होते लोक, पण विकला गेला १.२५ कोटी रूपयांना; जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:16 IST2026-02-26T11:59:19+5:302026-02-26T12:16:22+5:30
Viral News : साधारण १०५ वर्ष जुन्या या ट्रॅक्टरची किंमत अचानक आकाशाला भिडली आणि हा ट्रॅक्टर १.२५ कोटी रूपयांना विकला गेला. आता ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

१०५ वर्ष जुन्या ट्रॅक्टरला भंगार समजत होते लोक, पण विकला गेला १.२५ कोटी रूपयांना; जाणून घ्या कारण...
Viral News : जुन्या गाड्यांना म्हणजेच व्हिंटेज कारना भरपूर किंमत मिळते हे आपण अनेकदा पाहिलंही असेल आणि ऐकलंही असेल. या जुन्या गाड्या अनेकांसाठी स्टेटसचा विषय असतात. कोट्यावधी रूपयांमध्ये या गाड्या विकल्या जातात. पण एखाद्या जुन्या ट्रॅक्टरा कोट्यावधी रूपये का मिळतील? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. जालंधरमध्ये एक जुना ट्रॅक्टर कोट्यावधी रूपयांना विकला गेलाय. येथील शहीद भगत सिंह चौकात अनेक दशकांपासून एक जुना ट्रॅक्टर पडलेला होता. भंगार समजून त्याकडे कुणी बघतही नव्हतं. लहान मुलं त्यावर खेळत होते. पण जेव्हा या ट्रॅक्टरचं सत्य समोर आलं तेव्हा सगळेच हैराण झाले. साधारण १०५ वर्ष जुन्या या ट्रॅक्टरची किंमत अचानक आकाशाला भिडली आणि हा ट्रॅक्टर १.२५ कोटी रूपयांना विकला गेला. आता ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
पंजाबमधील जालंधर येथे शहीद भगत सिंह चौक जवळ एका जीर्ण इमारतीजवळ हा ट्रॅक्टर अनेक वर्षे तसाच उभा होता. त्याचे टायर पूर्णपणे झिजलेले होते आणि बॉडीवर जंगाचा जाड थर चढलेला होता. अवस्था इतकी खराब होती की लोक त्याला भंगारच समजत होते. तरीही त्याची धूर सोडणारी चिमणी सरळ उभी होती आणि स्टीयरिंग आपल्या जागेवर घट्ट बसलेले होते. विशेष म्हणजे, ज्यांनी लहानपणी या ट्रॅक्टरवर खेळ केला होता, त्यांच्या नातवंडांनीही त्याच ट्रॅक्टरवर खेळ केला; पण ही मशीन मात्र वर्षानुवर्षे तिथेच उभी राहिली.
व्हायरल व्हिडिओने बदलली किंमत
सुमारे अडीच महिन्यांपूर्वी एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने या ट्रॅक्टरचा व्हिडीओ बनवून पोस्ट केला. व्हिडीओ व्हायरल होताच तो खरेदी करण्यासाठी सतत फोन येऊ लागले. नगरसेवक पुनीत वढेरा यांच्या मते, सुरुवातीला मुंबईतील एका कंपनीने केवळ २ लाख रुपयांची ऑफर दिली होती. पण रस वाढताच बोली झपाट्याने वाढली आणि दुसऱ्याच दिवशी ती २८ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. अखेर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेत राहणाऱ्या मालकाने हा ट्रॅक्टर १.२५ कोटी रुपयांना विकला. त्यामुळे हा सौदा संपूर्ण इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला.
इतका खास का आहे हा जर्मन ट्रॅक्टर?
हा काही साधा ट्रॅक्टर नाही, तर जर्मनीतील मॅनहाइम येथे तयार झालेला व्हिंटेज ‘लँज बुलडॉग HL-12’ ट्रॅक्टर आहे, जो सुरुवातीच्या यशस्वी ट्रॅक्टरांपैकी एक मानला जातो. त्याच्या बाजूला LANZ आणि मागील बाजूला हेनरिक लांज़ मॅनहाइम असे लिहिलेले होते. १९२१ साली डॉ. फ्रिट्ज़ ह्यूबर यांनी सादर केलेला हा ट्रॅक्टर हॉट-बल्ब इंजिन तंत्रज्ञानावर चालत असे. तो कच्चे तेल तसेच विविध प्रकारच्या इंधनावर काम करू शकत होता. ही अनोखी अभियांत्रिकी रचना आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व यामुळेच हा ट्रॅक्टर आज कलेक्टर्ससाठी अत्यंत मौल्यवान ठरला आहे. आता हा ट्रॅक्टर कॅलिफोर्नियाच्या म्युझिअममध्ये ठेवण्यात येणार आहे.