Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:58 IST2025-10-13T12:57:06+5:302025-10-13T12:58:07+5:30
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
Viral Video : सोशल मीडियावर सध्या भारतात फिरायला आलेल्या एका रशियन पर्यटक महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला काही मुलांना रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल फटकारताना दिसते. या घटनेनंतर अनेकांनी महिलेच्या वर्तनाचं कौतुक केलं असून, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीसुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया देत “कृपया संवेदनशील बना” असं आवाहन केलं आहे.
हा व्हिडिओ ‘Meena Finds’ नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्या महिलेने “म्हणूनच शिक्षण आवश्यक आहे” असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडिओमध्ये ती काही मुलांना जमिनीवर पडलेला कचरा उचलून कचरापेटीत टाकण्यास सांगताना दिसते. मात्र, मुलं तिचं म्हणणं ऐकत नाहीत आणि पुन्हा तिच्यासमोर कचरा रस्त्यावर फेकतात.
यावेळी ती म्हणते, “हे योग्य नाही. हा तुमचा देश आहे. तुम्ही असं करत राहिलात, तर कायम कचर्यातच राहाल.” यानंतर ती मुलं महिलेकडे पैशांची मागणी करतात, मात्र महिला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर ती मुलं महिलेचा पाठलाग करतात आणि तिच्यासमोर मुद्दामून रस्त्यावर करचा फेकताना दिसतात.
केंद्रीय मंत्री रिजिजूंची प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत कॅप्शनमध्ये “कृपया संवेदनशील बना,” असं लिहिलं आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स या घटनेवर प्रतिक्रिया देत पर्यटक महिलेचं समर्थन करत आहेत एका यूजरने लिहिलं, “मुलांना लहानपणापासून स्वच्छतेची सवय लावणं गरजेचं आहे.” तर दुसऱ्याने म्हटलं, “आपल्याला वाईट वाटतं की, एका पर्यटकाला हे दृश्य पहावं लागतंय.” दरम्यान, ही घटना केवळ व्हायरल क्लिप नसून भारतीयांचा सार्वजनिक स्वच्छतेबाबत असलेला निष्काळजी दृष्टिकोन जगासमोर मांडते.