VIDEO: उड्डाण करण्याआधीच विमानात घुसलं कबुतर; प्रवासी पकडण्यासाठी धावले, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:09 IST2025-12-05T14:02:27+5:302025-12-05T14:09:16+5:30
बंगळूरुहून वडोदराला जाणाऱ्या विमानात कबुतर घुसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.

VIDEO: उड्डाण करण्याआधीच विमानात घुसलं कबुतर; प्रवासी पकडण्यासाठी धावले, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Pigeon Entered Plane: देशभरात विमान कंपन्यांच्या विमानांना होणारा विलंब आणि विमानांच्या रद्द होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच बंगळूरुहून वडोदराला जाणाऱ्या इंडिगोच्या विमाना एक अशी विचित्र घटना घडली, ज्यामुळे प्रवासी क्षणभर घाबरले आणि नंतर त्यांना हसू आवरलं नाही. प्रवाशांनी शेअर केलेल्या एका व्हायरल व्हिडिओनुसार, या विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच, एक कबुतर थेट विमानाच्या केबिनमध्ये घुसले.
व्हायरल व्हिडीओनुसार हा सगळा प्रकार तीन दिवसांपूर्वी बंगळूरुहून वडोदराला जाणाऱ्या विमानात घडला. प्रवाशांनी विमानात प्रवेश केल्यानंतर काही वेळातच हे कबुतर केबिनमध्ये फडफडताना दिसले. अचानक आलेल्या या पाहुण्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. कबुतर सीटच्या वरच्या भागात आणि सीटच्या मधून वेगाने उडत होते. घाबरलेले काही प्रवासी मान खाली घालून बसले, तर काही जण या विनातिकीट पाहुण्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागले.
व्हिडिओमध्ये काही प्रवासी जॅकेट, हातवारे करून कबुतराला बाहेर काढण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. या घटनेमुळे विमानात काही वेळ कबुतराचा पाठलाग सुरू झाला, ज्यामुळे प्रवासी आश्चर्यचकित झाले. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. क्रू मेंबर्सनीही कबुतराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि केबिनमधून विमान सुरक्षित असल्याची घोषणा झाल्यानंतर विमानाने नियोजित वेळेत उड्डाण घेतले.
घटना 3 दिन पूर्व की है जब वडोदरा से बैंगलोर जा रही इंडिगो फ्लाइट में सफर के दौरान एक परिंदा अंदर उड़ता हुआ घूम रहा है शायद ज़्यादा उड़ान भरते भरते थक गया था, इसलिए उसने भी थोड़ा आराम करने का सोचा और फ्लाइट पकड़ ली।#Indigoairlinespic.twitter.com/uvZaSRDSxm
— Ilyas (@Ilyas_SK_31) December 5, 2025
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेक नेटिझन्सनी यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी आता कबुतरांनाही बजेट एअरलाईनमधून प्रवास करायला आवडतो, असं म्हटलं. तर काहींनी कबुतराजवळ नक्कीच बोर्डिंग पास असेल असं म्हटलं. मात्र या घटनेमुळे विमानतळाच्या आणि विमानातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. विमानतळाच्या अतिसुरक्षित क्षेत्रातून एक पक्षी थेट केबिनमध्ये कसा पोहोचला, याबाबत प्रवाशांमध्ये चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ इंडिगो एअरलाइनचा असल्याचा दावा व्हायरल व्हिडिओमध्ये केला जात आहे. मात्र, कंपनीने अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इंडिगोच्या सध्याच्या गोंधळात आणखी भर
ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला पायलट आणि क्रू मेंबर्सच्या कमतरतेमुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. देशभरात इंडिगोच्या विमानांना मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.