Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:47 IST2025-08-21T15:47:17+5:302025-08-21T15:47:56+5:30
या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
Viral Video: गेल्या काही काळापासून कुत्र्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील भटकेच नाही, तर पाळीव कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका पाळीव कुत्र्यामुळे चक्क मालकाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मार खावा लागला आहे.
सध्या सोशल मीडियापासून ते माध्यमांपर्यंत सर्वत्र कुत्र्याचा मुद्दा चर्चेत आहे. अलिकडेच दिल्लीमधील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यामुळे सोशल मीडियावर कुत्राप्रेमी आणि कुत्राविरोधी असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या या आदेशाला स्थगिती दिली असली तरी, कुत्र्यांच्या मुद्द्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रस्त्यावरील भटके कुत्रे अनेकदा लहान मुलांसह मोठ्यांवरही हल्ला करतात. यामध्ये अनेकदा गंभीर स्वरुपाची दुखापतही होते.
विशेषतः लहान मुलांवरील कुत्र्याचे हल्ले अतिशय भीषण असतात. भटके कुत्रे एखाद्या लहान मुलाला एकट्यात गाठून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करतात. काही प्रकरणांम तर कुत्र्यांनी अक्षरशः शरीराचे लचके तोडल्याचेही पाहायला मिळाले आहे. यामुळेच काही जणांना कुत्र्यांचा प्रचंड राग येतो, तर काहीजण अजूनही त्यांचे प्रचंड लाड-प्रेम करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कुत्र्यामुळे मालकाला बेदम मार खावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 2024 चा आहे, मात्र कुत्र्यांचे प्रकरण चर्चेत असल्यामुळे पुन्हा फेसबुक आणि एक्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओबाबत दावा केला जातोय की, एका तरुणाने पाळलेला कुत्रा सतत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर भुंकायचा. काहीवेळा तर तो हल्ला करण्याचा प्रयत्नही करत असे. कुत्र्याचा मालक मात्र त्याला आवरण्यासाठी काहीही करायचा नाही. या गोष्टीला संतापलेल्या परिसरातील काही लोकांनी थेट त्या तरुणावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला.सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.