Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:31 IST2025-08-08T15:30:30+5:302025-08-08T15:31:44+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका प्राणी संग्रहालयातील आहे. जिथे लोक प्राण्यांना पाहण्यासाठी आलेत.

Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
सध्या महाराष्ट्रात कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीवरून बरीच चर्चा सुरू आहे. या हत्तीचा नांदणी मठातील वावर आणि तिथल्या लोकांशी झालेले भावनिक नाते साऱ्यांनीच पाहिले. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका हत्तीचं हृदय किती मोठे आणि भावनेने भरलेले असू शकते हे या व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट दिसून येते. प्राणी संग्रहालयात एक लहानगा हत्तीच्या पिंजऱ्यात पडला. त्यानंतर तिथे उपस्थित असणारे सर्वच घाबरले. या मुलाचे कुटुंबही चिंतेत पडले. मात्र त्यानंतर या हत्तीने जे केले ते सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारे होते.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका प्राणी संग्रहालयातील आहे. जिथे लोक प्राण्यांना पाहण्यासाठी आलेत. या व्हिडिओत एक छोटा मुलगा हत्तीच्या पिंजऱ्यात पडल्याचे दिसून येते. या मुलाला पाहून हत्ती त्याच्या दिशेने येतो तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र हा हत्ती त्याच्या सोंडेच्या आणि पायाच्या सहाय्याने त्या मुलाला उचलून त्याच्या कुटुंबाकडे सोपवतो. ही घटना पाहून कुणाच्याही डोळ्यांना विश्वास बसत नाही. एका चमत्कारापेक्षा हे कमी आहे अशी भावना लोक व्यक्त करत होते.
हे दृश्य पाहून तिथले लोक भावूक होतात. तिथे उपस्थित असणाऱ्या एका जोडप्याने हा नजारा त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून लाखो लोकांची मने या हत्तीने जिंकली आहेत. लोक या हत्तीचा संवेदनशीलपणा पाहून कौतुक करत आहेत. प्राण्यांमध्येही माणसांसारखे हृदय आणि भावना असतात, ज्या माणसांपेक्षा जास्त पटीने व्यक्त होतात असं काहींचे म्हणणे आहे. गजराजाने जे केले ते सर्वांसाठी उत्तम उदाहरण आहे. या हत्तीने खरोखरच ममता काय असते हे जगाला दाखवून दिले आहे असं लोकांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे जेव्हा मुलगा पिंजऱ्यात पडला तेव्हा हत्ती त्याच्या दिशेने गेला. तेव्हा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत पाहून त्याने गती कमी केली. त्यानंतर हळूहळू तो मुलाच्या जवळ गेला. त्यानंतर लांबड्या सोंडेने आणि पायाच्या मदतीने अलगद हत्तीने मुलाला उचलले. एखादी आई मुलाला उचलते तसे हत्तीने मुलाला सांभाळले. त्यानंतर त्या मुलाला कुटुंबाकडे सोपवले.