दोन पाकिस्तानी आणि एक भारतीय अशा तीन मुलांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर बाल सुधारगृहातच गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलांनी आपासात भांडण सुरू असल्याचे नाटक केले. त्यांना सोडवण्यासाठी पोलीस गेले आणि तेव्हाच त्यातील एकाने दोघांवर जवळून गोळ्या झाडल्या. या घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.
जम्मू काश्मीरमधील बाल सुधारगृहात सोमवारी ही घटना घडली आहे. अल्पवयीन असलेल्या तिघांना बाल सुधारगृहात ठेवले गेले होते. यातील दोघे हे पाकिस्तानी असून, एक भारतीय आहे.
बाल सुधारगृहात काय घडलं, व्हिडीओ बघा
पाठिमागून आला आणि गोळ्या झाडल्या
जम्मूतील आरएस पुरातील बाल सुधारगृहात सोमवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी ५.०५ वाजता कैदेत असलेल्या तिघांनी आपासात भांडण करण्याचे नाटक केले. भांडण सुरू असल्याचे बघून अधिकारी आणि कर्मचारी आत गेले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या तिसऱ्या मुलाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
पाकिस्तानी मुलांची नावे काय?
या घटनेत पोलीस अधिकारी विनय कुमार आणि पोलीस कर्मचारी प्रवीण कुमार हे जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबारानंतर तिन्ही मुले फरार झाली आहेत. अहसान अन्वर आणि मोहम्मद सनौल्लाह हे दोघे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील आहेत. तर करणजित सिंग उर्फ गुग्गा हा जम्मूतील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही पाकिस्तानी मुले सीमा पार करून आली होती. त्यांचा दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी फरार झालेल्या तिघांना पकडण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. सध्या त्यांचा शोध सुरू आहे.