नवरा भाड्याने देणे आहे! ८५ हजारात नवरा भाड्याने देत आहे पत्नी, घटस्फोटाऐवजी काढला वेगळा तोडगा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:25 IST2026-03-16T14:24:25+5:302026-03-16T14:25:19+5:30
Viral News : थायलँडमधील एका महिलेने कथितपणे आपल्या पतीला घटस्फोट देण्याऐवजी त्याला त्याच्या गर्लफ्रेन्डला भाड्याने देण्याची ऑफर दिली आहे.

नवरा भाड्याने देणे आहे! ८५ हजारात नवरा भाड्याने देत आहे पत्नी, घटस्फोटाऐवजी काढला वेगळा तोडगा...
Viral News : पती - पत्नीतील विचित्र वादाच्या, अनैतिक संबंधांच्या, घटस्फोटांच्या कितीतरी अनोख्या घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. भांडणांची, अफेअरची आणि वेगळे होण्याची काही कारणं फारच विचित्र असतात. पण सध्या एका वेगळ्याच आणि अचंबित करणाऱ्या भानगडीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. थायलँडमधील एका महिलेने कथितपणे आपल्या पतीला घटस्फोट देण्याऐवजी त्याला त्याच्या गर्लफ्रेन्डला भाड्याने देण्याची ऑफर दिली आहे. नवरा भाड्याने देण्यासाठी तिने त्याच्या गर्लफ्रेन्डकडे भाडे म्हणून ३० हजार बात म्हणजे भारतीय करन्सीनुसार ८५ हजार रूपये महिन्याची मागणी केली आहे.
नेमकी काय आहे पती-पत्नीची भानगड?
खाओसोदच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण एका टीव्ही शोमधून समोर आलं आहे. शोमध्ये खुन क्वांग नावाच्या महिलेने खुलासा केलाय की, तिच्या पोलीस अधिकारी पतीचं बऱ्याच वर्षांपासून एका महिलेसोबत अफेअर सुरू होतं आणि तो तिच्या घरीही राहू लागला होता. क्वांग म्हणाली की, ती आणि तिचा पती कॉलेजपासून एकमेकांसोबत आहे. २१ व्या त्यांनी लग्न केलं होतं. दोघांना ८ वर्षांचा एक मुलगाही आहे. ती सांगते की, २०२५ पर्यंत त्यांचं जीवन सुरळीत सुरू होतं. पण पतीचं वागणं अचानक बदललं. तो घरी उशिरा येऊ लागला होता. एक दिवस तो रात्री घरी आला आणि परिवार सोडण्याचं बोलू लागला. इतकंच नाही तर असं म्हणत त्याने घर, गाडी आणि कर्ज सगळं आपल्या पत्नी आणि मुलाला दिलं. तो घर सोडून गेला. पण काही दिवसांनी पत्नीच्या म्हणण्यावरून तो घरी परत आला. पण क्वांगला नंतर समजलं की, पतीचं अफेअर अजूनही सुरू आहे.
महिलेने सांगितलं की, 'त्यावेळी मी फारच अस्वस्थ कन्फ्यूज आणि विचारात होती. पण मी त्याला काही विचारलं नाही. आम्ही वेगवेगळे झोपलो. पण संशयामुळे मी माझ्या पतीच्या वागण्याची माहिती काढण्यासाठी एक खाजगी जासूस नियुक्त केला. प्रायव्हेट डिटेक्टिवच्या हाती मग महत्वाचा पुरावा लागला. डिटेक्टिवने मला सांगितलं की, पती रामखामहांग भागातील एका घरात गेला होता'. क्वांग त्या ठिकाणी पोहोचली, पण पती तिथून निघून गेला होता. क्वांगने पतीला फोन केला आणि म्हणाली की, समोरासमोर बोलण्यासाठी घरी परत ये, नाही तर ती स्वत: येऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावेल.
शेवटी पती घरी परत येण्यास तयार झाला. तो म्हणाला की, दुसऱ्या महिलेने त्यांचं अफेअर संपवण्यास नकार दिला होता आणि संबंध तोडले तर जीवाचं काहीतरी बरं वाईट करण्याची धमकी दिली होती. या स्थितीचा सामना केल्यानंतर क्वांगने सांगितलं की, दुसऱ्या महिलेने हे मान्य केलं होतं की, तिला होतं की व्यक्ती आधी विवाहित आहे आणि त्याला एक मुलगा आहे. जेव्हा क्वांगने परिवाराच्या कर्जाचा मुद्दा उठवला आणि विचारलं की, जर आम्ही वेगळे झालो तर ती जबाबदारी घेईल का? यावर महिलेने नकार दिला आणि हे प्रकरण पती-पत्नीने स्वत: निस्तरण्यास सांगितलं.
यानंतर पती घरी परत आला आणि काही दिवस जीवन सामान्य सुरू झालं. पण एका रात्री पती अचानक उठला आणि म्हणाला की, त्याला गर्लफ्रेन्डची आठवण येत आहे. क्वांग सांगते की, 'माझा पती एक रात्री अचानक उठला आणि म्हणाला की, मला तिची आठवण येत आहे आणि तो तिच्यासोबत नातं तोडू शकत नाहीये. तो अस्वस्थ आणि चिंतेत होता. त्या रात्री आम्ही दोघांनी चर्चा केली. मी त्याला त्या महिलेला फोन करण्यास सांगितलं. मी तासभर त्यांचं बोलणं ऐकलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, दोघांचं अफेअर संपलेलं नाही, ते अजूनही सुरू आहे'.
क्वांगने दिली ऑफर
क्वांगने पतीच्या गर्लफ्रेन्डसमोर एक प्रस्ताव ठेवला. ती म्हणाली की, पती गर्लफ्रेन्डसोबत राहू शकतो. पण गर्लफ्रेन्डने दर महिन्याला मला ३० हजार बात द्यायला हवे. हे पतीसाठी भाडं मानलं जाईल. क्वांगने पतीला घटस्फोट देण्यास नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे गर्लफ्रेन्डने हा प्रस्ताव मान्य केला. पण पतीने या गोष्टीला नकार दिला. आता क्वांगने पतीच्या गर्लफ्रेन्डविरोधात केस दाखल केली आहे. कायदेतज्ज्ञ पॅट अनुसॉर्न असुरापोंग यांनी स्पष्ट केलं की, अशाप्रकारच्या कराराबाबत थायलँडमध्ये कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. कारण ही बाब सार्वजनिक व्यवस्था आणि देशाच्या एकविवाह कायद्याचं उल्लंघन करते.