पँटमध्ये गुप्त खिसा अन् टार्गेटवर महागडं तूप; ऑस्ट्रेलियावरून परतलेल्या IT प्रोफेशनलचा चोरीचा अजब कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:59 IST2026-02-11T14:52:36+5:302026-02-11T14:59:57+5:30
हरियाणात एका दुकानातून चोरी करणाऱ्या व्यक्तीला दुकान मालकाने रंगेहाथ पकडले.

पँटमध्ये गुप्त खिसा अन् टार्गेटवर महागडं तूप; ऑस्ट्रेलियावरून परतलेल्या IT प्रोफेशनलचा चोरीचा अजब कारनामा
Haryana Crime: हरियाणात परदेशातून फिरून आलेल्या उच्चशिक्षित असलेल्या व्यक्तीने चोरीचा असा काही मार्ग निवडला की ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. नुकताच ऑस्ट्रेलियावरुन परतलेल्या एका तरुणाला कर्नालमधील मोर डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. चोरी करण्यासाठी या पठ्ठ्याने आपल्या पँटमध्ये चक्क एक गुपित खिसा तयार केला होता.
कर्नालमधील रेल्वे रोडवर असलेल्या मोर स्टोअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सामान मोजताना कमी दिसून येत होती. महागड्या वस्तू गायब होत असल्याने स्टोअर मॅनेजरने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक व्यक्ती वारंवार संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. मंगळवारी जेव्हा हा तरुण पुन्हा स्टोअरमध्ये आला, तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्याने केवळ १०-२० रुपयांच्या मॅगी पाकिटाचे बिल बनवले, मात्र त्याच्या पँटमध्ये त्याने हजारो रुपयांचे सामान लपवले होते.
चोरीच पद्धत
आरोपी अश्विनी भाटिया याने चोरी करण्यासाठी विशेष डोकं लढवलं होतं. त्याने आपल्या पँटच्या आतमध्ये एक गुप्त कप्पे तयार केले होते. तो स्टोअरमध्ये शिरून २५०० रुपये किमतीचे किलो गायीचे शुद्ध तूप, ५०० रुपयांचा मध, कोरियन सॉस, पनीर आणि केचअप या वस्तू हळूच त्या गुप्त खिशात सरकावून द्यायचा आणि बाहेर पडताना साध्या किरकोळ वस्तूचे बिल द्यायचा, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये.
ऑस्ट्रेलिया दौरा आणि आयटी बॅकग्राउंड
अश्विनी भाटिया हा कोणताही सामान्य चोर नाही. तो आयटी क्षेत्रात कामाला होता आणि त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. तो स्वतःही काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाला टूरिस्ट व्हिसावर जाऊन आला होता. भारतात परतल्यानंतर केवळ एका आठवड्यात त्याने या चोऱ्या सुरू केल्या. पकडल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला असून वेळ खराब आहे असे अजब उत्तर दिले आहे.
कर्मचाऱ्यांनीच पकडले रंगेहाथ
याआधी त्याने तीन वेळा याच स्टोअरमध्ये हात साफ केला होता. सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाला होता, पण ओळख पटत नव्हती. मंगळवारी त्याने चौथ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याला दारातच रोखले. त्याची झडती घेतली असता पँटमधून तूप, मध आणि सॉसची पाकिटे बाहेर पडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पोलिसांची कारवाई
स्टोअरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अश्विनीला ताब्यात घेतले असून त्याची ॲक्टिव्हा गाडीही जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी त्याने मेरठ रोडवरील एका स्टोअरमधून चहापत्तीची पाकिटे चोरल्याचाही संशय आहे.