पैसे दे! नाहीतर... UPI पेमेंट फेल होताच विक्रेत्याची गुंडगिरी; १५ रुपयांच्या समोश्यासाठी दिलं महागडं घड्याळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:29 IST2025-10-19T10:49:29+5:302025-10-19T12:29:26+5:30
मध्य प्रदेशात रेल्वे स्थानकावर एका समोसा विक्रेत्याची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पैसे दे! नाहीतर... UPI पेमेंट फेल होताच विक्रेत्याची गुंडगिरी; १५ रुपयांच्या समोश्यासाठी दिलं महागडं घड्याळ
Jabalpur Samosa Vendor: रेल्वे स्टेशनवरचा चहा-समोसा प्रवासाची एक खास आठवण ठेवून जात असतो. पण जबलपूर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाला ही आठवण कायमची लक्षात राहणार आहे. जबलपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एका समोसा विक्रेत्याच्या गुंडगिरीमुळे एका प्रवाशाला आपल्या हातातील घड्याळ गमावून गाडी पकडावी लागली. यूपीआय पेमेंट फेल झाल्याने हा सर्व प्रकार घडला.
शुक्रवारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. एक प्रवासी प्लॅटफॉर्मवर गाडी थांबलेली असताना समोसा घेण्यासाठी खाली उतरला. त्याने समोसा घेतला आणि पेमेंट करण्यासाठी यूपीआय स्कॅन केले, पण व्यवहार पूर्ण होण्याआधीच गाडी सुरू झाली. आपले घर गाठण्याची घाई असलेल्या प्रवाशाने ट्रेनकडे धाव घेतली, पण त्याच क्षणी समोसेवाल्याने त्याची कॉलर पकडली.
व्हिडिओनुसार, प्रवासी वारंवार पैसे नसल्याचे सांगत ट्रेन सुटत असल्याची विनंती करत असतानाही समोसेवाल्याने त्याची कॉलर सोडली नाही. अखेरीस, नाईलाजाने त्या प्रवाशाने आपल्या हातातील मौल्यवान घड्याळ काढून त्याच्या हातात दिले आणि जीव वाचवत गाडी पकडली. समोसेवाल्याने इतके करूनही प्रवाशाला जाताना समोसा घेण्याची जबरदस्ती केली.
हा संपूर्ण प्रकार प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि काही प्रवाशांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये कैद झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच, रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. डीआरएम जबलपूर यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली. त्यानंतर काही तासांतच रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने आरोपी समोसा विक्रेत्याच ओळख पटवली आणि त्याला त्वरित ताब्यात घेतले. जबलपूरच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी एक्स हँडलवरून या कारवाईची माहिती दिली. आरोपी वेंडरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे, तसेच त्याचे वेंडिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
Jabalpur Railway Station 🚉
— Shashank Shekhar Jha (@shashank_ssj) October 19, 2025
A passenger ordered samosas.
UPI failed & as train started moving, he left samosa.
Vendor grabbed his collar, snatched his watch & forced him to take samosa.
Now, @drmjabalpur has arrested the vendor.
pic.twitter.com/y3VDaXvAJ8
रेल्वेच्या या जलद कारवाईमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे, पण एका समोशासाठी प्रवाशाकडून जबरदस्तीने घड्याळ काढून घेण्याचा हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या मते, गर्दीच्या वेळी विक्रेत्यांची ही मनमानी आणि गुंडगिरी प्रवासाला गालबोट लावणारी आहे. तसेच काहीजण स्वतःजवळ सुट्टे पैसे ठेवायला हवेत असंही म्हणत आहेत.