China Drone Rescue Man: तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपला शेजारी असलेला चीन जबरदस्त पुढे निघून गेला आहे. नुकतंच याचे एक उदाहरण समोर आलं आहे. चीनमधील तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे की आता ते ड्रोनद्वारे आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवत आहे. चीनमध्ये ड्रोनच्या सहाय्याने एका व्यक्तीला वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. डोनद्वारे एका व्यक्तीला पुरातून बाहेर काढल्यानंतर सुखरुपणे सुरक्षित जागी उतरवण्यात आलं. चीनच्या या ड्रोनचं सर्वत्र कौतुक होतं आहे.
दक्षिण चीनमध्ये आलेल्या महापुराने तिथल्या भागांमध्ये कहर केला आहे. पुरामुळे स्थानिक लोक अडचणीत सापडले आहेत. त्याच वेळी लाखो लोक बेघर झाले आहेत. दरम्यान, पुरामुळे छतावर अडकलेल्या एका व्यक्तीला ड्रोनने मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या आठवड्यात चीनमधील लिउझोऊ शहरात पुराच्या पाण्यामुळे एक माणूस त्याच्या दुमजली घराच्या छतावर अडकला होता. तो मदतीसाठी मोठ्याने ओरडत होता, मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बचाव पथकाच्या बोटी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. शेवटी त्याच्या शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याने त्याला मदतीचा हात दिला. त्याने त्याच्या ॲग्रीकल्चर ड्रोनने बचाव मोहीम पार पाडली. शेजारच्या शेतकऱ्याने ॲग्रीकल्चर ड्रोनच्या मदतीने त्या माणसापर्यंत दोरी पाठवली आणि नंतर त्याला हळूहळू तिथून सुरक्षित ठिकाणी आणलं. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचा वापर सामान्यतः विटा, सिमेंट किंवा कीटकनाशके फवारण्यासाठी केला जातो आणि ते १०० किलोपर्यंतचे वजन वाहून नेऊ शकतात. शेतकऱ्याने ड्रोनच्या दोरीला वाळूची पिशवी बांधली आणि तात्पुरता हार्नेस तयार करण्यासाठी त्यावर एक सेफ्टी बकल लावला होता. त्यानंतर त्याने ड्रोन त्याचे शेजाऱ्यापर्यंत पोहोचवला आणि फोनवरून त्याला पोत्यावर बसून त्याचे हातपाय सेफ्टी बकलने दोरीला बांधण्याची सूचना केली.
६५ फूट उंचीवरून उडणाऱ्या ड्रोनने पुरात अडकलेल्या व्यक्तीला झाडे आणि विजेच्या खांबांमधून सुरक्षित बाहेर काढलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीने सांगितले की तो गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ड्रोन वापराला शिकला. "मी जे केले ते बेकायदेशीर होते, कारण माणसाला घेऊन जाणे हे ड्रोन नियमांच्या विरुद्ध आहे. पण त्यावेळी माझी पहिली प्राथमिकता त्या माणसाचा जीव वाचवणे होती. मला माहित आहे की ते बेकायदेशीर आहे, परंतु मला घर कोसळेल अशी भीती वाटत होती, म्हणून मी त्याला वाचवण्याचा निर्णय घेतला. मी कोणालाही हे पुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन देणार नाही," असं शेजाऱ्याने सांगितले.