'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:34 IST2025-08-13T19:32:51+5:302025-08-13T19:34:54+5:30
सोशल मीडियात कॉलेज सर्वाइवल किट हा ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. ४२ वर्षीय जेमी ग्रीनने तिच्या मुलीसाठी ही किट बनवली आहे

'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
जिथे एकीकडे आई वडील आजही आपल्या पाल्यासोबत काही विषयांवर बोलताना संकोच करतात तिथे दुसरीकडे जग बदलत आहे. अमेरिकेत एक नवीन अजब गजब ट्रेंड पाहायला मिळत आहे. याठिकाणी आई वडील कॉलेजला जाणाऱ्या मुलाला फक्त नोटबुक आणि पेन देत नाहीत तर कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे वाचवणारी औषधेही बॅगेत ठेवून पाठवत आहेत. या अनोख्या किटला कॉलेज सर्वाइवल किट नाव देण्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, अमेरिकेत फेंटानिलसारखे ड्रग्स आता १८ ते ४५ वयातील युवकांमध्ये मृत्यूचं कारण बनत आहे. २०२३ साली ५० हजाराहून अधिक युवकांचा ड्रग्सच्या चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे कबूल केले. बऱ्याचदा या युवकांना आपण फेंटानिल घेतोय हेदेखील माहिती नसते. त्यामुळे आई वडिलांना ना केवळ शिक्षणासाठी तर आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी तयार करावे लागत आहे. या किटमध्ये नारकैनसारख्या औषधांचा समावेश आहे जो ऑपिऑइड ओवरडोसचा परिणाम लगेच संपवतो आणि जीव वाचतो. त्याशिवाय कंडोमसारख्या गोष्टीही दिल्या जातात. त्यातून अनावश्यक गर्भधारणा आणि लैंगिक रोगापासून वाचता येईल.
सोशल मीडियात व्हायरल होतोय ट्रेंड
सोशल मीडियात कॉलेज सर्वाइवल किट हा ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. ४२ वर्षीय जेमी ग्रीनने तिच्या मुलीसाठी ही किट बनवली आहे. या किटचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला ५६ लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. काही लोकांनी या प्रकारावर टीका करत यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो जे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य नाही असं म्हटले. मात्र हे मुलांना ड्रग्स अथवा लैंगिक संबंध यासाठी प्रोत्साहित करत नसून त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी केले जात असल्याचे मानसशास्त्रज्ञ यामालिस डियाझ यांनी सांगितले.
दरम्यान, काही जण या किटचं कौतुकही करत आहेत. जरी माझी मुले ड्रग्स वापरत नसली तरी आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे या वस्तू असाव्यात असं ५० वर्षीय ग्रेचेन शेफर यांच्यासारख्या अनेक आईने म्हटले आहे.