VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:07 IST2025-09-26T18:06:37+5:302025-09-26T18:07:26+5:30
Khawaja Asif Speech fumble:

VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
Khawaja Asif Speech fumble: पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर फजिती होणे हे काही नवीन नाही. अनेक वेळा विविध कारणाने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होतच असते. आताही पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्र्यांमुळे त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावरील एका महत्त्वपूर्ण बैठकीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ त्यांच्या उच्चारांमधील चुकांमुळे चर्चेचा विषय बनले आहेत. AI मुळे निर्माण झालेली आव्हाने आणि त्याचे धोके या विषयांवर बोलत असताना त्यांची अनेकदा इंग्रजी शब्दांबाबत फजिती झाली. मीडिया रिपोर्टनुसार, आसिफ यांनी चक्क सात वेळा शब्दांचे अशुद्ध उच्चारण केले. त्यामुळे त्यांचे हे भाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
ख्वाजा आसिफ यांचे काय-काय शब्द चुकले?
ख्वाजा आसिफ भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी AI बाबत बोलायला सुरूवात केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, त्यांच्या भाषणात ते विशेषतः 'breathtaking' (ब्रेथटेकिंग), 'reshaping our world'(रिशेपिंग आवर वर्ल्ड) आणि 'space' (स्पेस) यांसारखे इंग्रजी शब्द उच्चारताना वारंवार अडखळले. याशिवाय, त्यांनी 'risk' (रिस्क) या शब्दाचा उच्चार 'riks' (रिक्स) असा केल्याने सभागृहात थोडीशी अस्वस्थताही पसरलीहोती. तो क्षणही त्वरित कॅमेऱ्यात कैद झाला.
भाषणात काय म्हणाले ख्वाजा आसिफ?
उच्चारांमधील त्रुटी बाजूला ठेवून, आसिफ यांनी AI मुळे वाढणाऱ्या गंभीर धोक्यांबाबत केलेल्या भाषणात काही महत्त्वाचे मुद्दे होते. AI मुळे युद्धाची शक्यता आणखी वाढू शकेल, निर्णय घेण्याचा वेळ कमी होईल आणि राजकीय तोडगा काढण्याचे मार्ग संकुचित होतील, अशी गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच, AI चा गैरवापर झाल्यास डिजिटल दरी वाढेल आणि जागतिक शांततेला धोका निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
यावेळी, त्यांनी नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाचा संदर्भ देत 'ऑपरेशन सिंदूर' हे AI-आधारित युद्धाच्या धोक्याचे उदाहरण असल्याचे सांगितले. मे २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे दिलेले प्रत्युत्तर, हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेले युद्ध कसे भयानक असू शकते, हे दर्शवते, असे त्यांचे म्हणणे होते.