Viral Video: आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात. सध्या पावसाळा सुरुये, अनेक ठिकाणी नद्या-धबधबे ओसंडून वाहत आहेत. अशा ठिकाणी रील बनवण्याचा ऊत आला आहे. मात्र, एका २२ वर्षीय युट्यूबरला धबधब्यात रील बनवणे जीवावर बेतले. व्हिडिओ शूट करताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला अन् तरुण एका झटक्यात वाहून गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही धक्कादायक घटना ओडिशा राज्यातील कोरापूट जिल्ह्यातील दुदुमा धबधब्यावर घडली. गंजम जिल्ह्यातील रहिवासी युट्यूबर सागर टुडू एका मित्रासोबत धबधब्यावर व्हिडिओ शूट करण्यासाठी गेला होता. दोघेही ड्रोन कॅमेऱ्याने सुंदर दृश्ये टिपत होते. यादरम्यान, सागरने एका मोठ्या दगडावर उभा राहून व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर माचकुंड धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला अन् सागर त्यात वाहून गेला.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, प्रवाह इतका जोरदार होता की, युट्यूबरला सावरण्याची संधीही मिळाली नाही. तो काही क्षणातच पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. यादरम्यान, त्याचा मित्र आणि तिथे उपस्थित असलेले इतर लोक त्याला वाचवण्यासाठी ओरडत राहिले, परंतु पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, कोणीही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत करू शकले नाही.
व्हिडिओ पहा
@viprabuddhi X (पूर्वीचे ट्विटर) या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटिझन्स विविध कमेंट करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. सध्या बचाव कार्य सुरू आहे. युट्यूबरचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.